‘ट्रीपल आयटी’तील विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेन्ट’च्या आकड्यांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 12:37 PM2021-10-07T12:37:42+5:302021-10-07T12:45:54+5:30
देशभरातील २० ‘ट्रीपल आयटी’तील नवीन संस्थांमध्ये नागपूरचा समावेश होतो. २०२१ मध्ये बाहेर पडलेल्या ‘बॅच’मधील ६४.३५ टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होण्याअगोदरच ‘प्लेसमेन्ट’ मिळाले. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून ओळख बनविणाऱ्या नागपूरसाठी ही निश्चितच सकारात्मक बाब आहे.
योगेश पांडे
नागपूर : ‘ट्रीपल आयटी’कडे (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) नामवंत कंपन्यांचा ओढा वाढत असून ‘कोरोना’चे वर्ष असूनदेखील विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेन्ट’च्या आकड्यात वाढ झाली असल्याचे दिसून आले.
२०२१ मध्ये बाहेर पडलेल्या ‘बॅच’मधील ६४.३५ टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होण्याअगोदरच ‘प्लेसमेन्ट’ मिळाले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सरासरी ‘पॅकेज’मध्येदेखील वाढ झाल्याचे दिसून आले. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून ओळख बनविणाऱ्या नागपूरसाठी ही निश्चितच सकारात्मक बाब आहे.
सन २०१६-१७ मध्ये नागपुरात ‘ट्रीपल आयटी’ची सुरुवात झाली. देशभरातील २० ‘ट्रीपल आयटी’तील नवीन संस्थांमध्ये नागपूरचा समावेश होतो. २०२०च्या ‘बॅच’मध्ये ४१ विद्यार्थ्यांनी ‘प्लेसमेन्ट ड्राईव्ह’साठी नोंदणी केली होती. २४ कंपन्या मुलाखतींसाठी आल्या होत्या व ३० विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेन्ट’ झाले होते. ही टक्केवारी ७३.१७ टक्के इतकी होती. तर, २०२१ च्या ‘बॅच’मध्ये १४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यावर्षी कंपन्यांमध्येदेखील वाढ झाली व ‘प्लेसमेन्ट’साठी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवरील ५६ कंपन्या आल्या. नोंदणी झालेल्यांपैकी १०९ विद्यार्थी मुलाखतींसाठी पात्र ठरले व ९१ जणांचे प्रत्यक्ष ‘प्लेसमेन्ट’ झाले. काही विद्यार्थ्यांना तर दोन किंवा त्याहून अधिक कंपन्यांच्या ‘ऑफर्स’ मिळाल्या.
४४.५ लाखांचे सर्वाधिक ‘पॅकेज’
२०२०च्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थ्यांचे सरासरी ‘पॅकेज’ ७.७ लाख इतके होते व २० लाख हा सर्वाधिक ‘पॅकेज’चा आकडा होता. यावर्षी यात वाढ झाली. सरासरी ‘पॅकेज’ ८.२७ लाख इतके होते व ४४.५ लाख रुपयांचे ‘पॅकेज’ सर्वाधिक ठरले. १६ विद्यार्थ्यांना १० लाख किंवा त्याहून अधिक ‘पॅकेज’ची ‘ऑफर’ देण्यात आली.
संगणक विज्ञानमध्ये जास्त ‘प्लेसमेन्ट’
‘ट्रीपल आयटी’मध्ये इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशन अभियांत्रिकी व संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या दोन महत्त्वाच्या शाखा आहेत. यातील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील ८९पैकी ७६ विद्यार्थी मुलाखतींसाठी पात्र ठरले व ६३ जणांचे ‘प्लेसमेन्ट’ झाले. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील ५२ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थी पात्र ठरले व २८ जणांचे ‘प्लेसमेन्ट’ झाले. दोन्ही विभाग मिळून १५० विद्यार्थ्यांना ‘ऑफर लेटर्स’ जारी करण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांना एकाहून जास्त ‘ऑफर’ होत्या.
‘प्लेसमेन्ट’ची आकडेवारी (२०२१)
विभाग | नोंदणीकृत विद्यार्थी | पात्र विद्यार्थी | प्लेसमेन्ट | जारी ऑफर लेटर्स |
इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशन अभियांत्रिकी | ५२ | ३३ | २८ | ५४ |
संगणक विज्ञान व अभियांत्रिकी | ८९ | ७६ | ६३ | ९६ |
एकूण | १४१ | १०९ | ९१ | १५० |