औरंगाबाद येथेच व्हावे आयआयएम

By admin | Published: December 17, 2014 12:28 AM2014-12-17T00:28:21+5:302014-12-17T00:28:21+5:30

मराठवाड्यावर आजवर सत्ताधाऱ्यांनी अन्याय केल्याची भावना गेल्या १५ वर्षात बळावली आहे. यातून जनमानसात रोष वाढत आहे. ही बाब विचारात घेता या भागाला न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने

IIM at Aurangabad | औरंगाबाद येथेच व्हावे आयआयएम

औरंगाबाद येथेच व्हावे आयआयएम

Next

सर्वपक्षीय आमदारांची मागणी : सभागृहाबाहेर निदर्शने
नागपूर : मराठवाड्यावर आजवर सत्ताधाऱ्यांनी अन्याय केल्याची भावना गेल्या १५ वर्षात बळावली आहे. यातून जनमानसात रोष वाढत आहे. ही बाब विचारात घेता या भागाला न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबाद येथच करा, अशी मागणी करीत या भागातील सर्वपक्षीय आमदारांनी मंगळवारी सभागृहाबाहेर नारेबाजी केली.
यात डॉ. मधुसूदन केंद्रे, सतीश चव्हाण, धनंजय मुंडे, विजय भांबळे, अर्जुन खोतकर, प्रताप चिखलीकर, संजय शिरसाट, रामराव वडकुते आदींचा समावेश होता.
आगामी डीएमआयसी प्रकल्पाच्या दृष्टीने ही संस्था औरंगाबाद येथे असणे हिताचे ठरणार आहे. मराठवाड्यातील जनतेचीही मागणी आहे.
या भागातील जनतेच्या भावना विचारात घेता तातडीने याची घोषणा करावी. ही संस्था या भागात स्थापन झाल्यास याचा शैक्षणिकदृष्ट्या फायदा होणार आहे. उच्च शिक्षणासाठी विभागातून बाहेर जाणाऱ्या युवकांची संख्या कमी होईल. भविष्यात येथेच रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होईल. याचा विचार करता सरकारने ही संस्था या भागात देण्याची घोषणा करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केल्याची माहिती सदस्यांनी दिली. दरम्यान याच मागणीसाठी १४ डिसेंबरपासून औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयापुढे महाविद्यालयीन विद्यार्थी व विविध ३० संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केल्याची माहिती आमदारांनी पत्रकारांना दिली.(प्रतिनिधी)
सर्व सोयींनी उपयुक्त शहर
महाराष्ट्रात नव्याने होऊ घातलेले आयआयएम औरंगाबाद शहरातच उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाचे सदस्य सय्यद इम्तियाज जलील यांनी विधानसभेत मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे केली. महाराष्ट्र शासनाने राज्यात नवीन आयआयएम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. परंतु ते कुठे होईल, याचा कुठेही उल्लेख नाही. औरंगाबाद शहरावर नेहमीच अन्याय होत आला आहे. त्यामुळे आयआयएमसारखी प्रतिष्ठित संस्था औरंगाबाद शहरातच उभारण्यात यावी. यासाठी २०० एकरची आवश्यकता आहे. २०० एकर असलेल्या अशा चार जागा औरंगाबाद शहरात असून त्यांची पाहणीसुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर यासाठी सर्व सोयीसुविधांनी उपयुक्त असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: IIM at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.