आयआयएम मिहानमध्येच
By Admin | Published: February 25, 2015 02:41 AM2015-02-25T02:41:06+5:302015-02-25T02:41:06+5:30
नागपूर येथील मिहान प्रकल्पात ‘मेट्रो रेल्वे ’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी ३७ हेक्टर तर इंडियन इन्स्ट्यिूट आॅफ मॅनेजमेंटसाठी (आयआयएम) २०० एकर जागा देण्याच्या निर्णयावर...
नागपूर: नागपूर येथील मिहान प्रकल्पात ‘मेट्रो रेल्वे ’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी ३७ हेक्टर तर इंडियन इन्स्ट्यिूट आॅफ मॅनेजमेंटसाठी (आयआयएम) २०० एकर जागा देण्याच्या निर्णयावर मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
आयआयएम आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जागा देण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. मंगळवारी मिहानच्या आढावा बैठकीत दोन्ही प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे मिहानमधील २०० एकर जागेवर आयआयएम साकारणार असून मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी ३७ हेक्टर जागा मिळणार आहे. भविष्याची गरज लक्षात घेता उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना सवलतीच्या दरात जागा देण्याच्या सूचनाही यावेळी फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.
मिहानमध्ये दर्जेदार शिक्षण देणारी शाळा सुरू करावी तसेच या शाळांमध्ये प्रकल्पबाधितांच्या मुलांना प्रवेश द्यावा, असेही ठरले. मिहान प्रकल्पासाठी कुठल्याही परिस्थितीत चढ्या दराने वीज घेणार नाही,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)