आयआयएम नागपूरच्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मिळाला भक्कम प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:08 AM2021-03-06T04:08:01+5:302021-03-06T04:08:01+5:30
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळातही भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर (आयआयएमएन)मध्ये १०० टक्के कॅम्पस प्लेसमेंट झाले. गेल्या काही दिवसापासून सुरू ...
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळातही भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर (आयआयएमएन)मध्ये १०० टक्के कॅम्पस प्लेसमेंट झाले. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांना चांगल्या वेतनाचे पॅकेज मिळाले. संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, देश-विदेशातील कंपन्यांनी येथील विद्यार्थ्यांची निवड करून १३.२१ लाख रुपयांपर्यंत पॅकेज दिले.
यावेळी विद्यार्थ्यांना मिळालेले पॅकेज गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. यावर्षीच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये शैक्षणिक सत्र २०१९ ते २०२१ चे विद्यार्थी सहभागी झाले होते. कॅम्पस प्लेसमेंटसाठी कन्सलटंट, बँकिंग, वित्तीय सेवा व विमा क्षेत्रासोबतच फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी), कन्झ्युमर ड्युरेबल्स, अॅड-टेक, ई-कॉमर्स, एनॉलिटिक्स व लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता. यात प्रामुख्याने बॅन अॅण्ड कंपनी, बीएनवाय मेलन, एक्सेंजर, आर्सेलर, मित्तल, डीएचएल, डेलोईट, डालमिया भारत, टाटा पॉवर आदी कंपन्यांचा समावेश होता. त्याचबरोबर ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनीसुद्धा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये भाग घेतला होता. विशेष म्हणजे इंटर्नशिपसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत आयआयएम नागपूरच्या विद्यार्थ्यांना देश व विदेशातील १०० हून अधिक कंपन्यांनी संधी दिली. यात मायक्रोसॉफ्ट, दोहा बँक, निविआ स्पोर्ट्स, बीएनवाय मेलॉन या कंपन्यांबरोबरच बँकिंग व इंजिनीअरिंग क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश होता. इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ६०,९५३ रुपयापासून अडीच लाख रुपयापर्यंत स्टायपंड देण्यात येणार आहे.