‘आयआयएम-नागपूर’ होणार 'इकोफ्रेंडली', अत्याधुनिक सुविधांसह जलस्वयंपूर्णतेकडेदेखील पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 11:58 AM2022-05-07T11:58:24+5:302022-05-07T12:05:19+5:30
विशेष म्हणजे संपूर्ण ‘कॅम्पस’ला ‘इकोफ्रेंडली’ करण्यावर भर देण्यात आला असून ‘थर्मल फूटप्रिंट’ कमी करण्यासाठी परिसरात ‘व्हेईकल फ्री झोन’देखील तयार करण्यात आला आहे.
योगेश पांडे
नागपूर : ‘आयआयएम-नागपूर’च्या कायमस्वरूपी इमारतीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या ‘कॅम्पस’च्या पहिल्या टप्प्यात साठ हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर बांधकाम करण्यात आले असून, जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण ‘कॅम्पस’ला ‘इकोफ्रेंडली’ करण्यावर भर देण्यात आला असून ‘थर्मल फूटप्रिंट’ कमी करण्यासाठी परिसरात ‘व्हेईकल फ्री झोन’देखील तयार करण्यात आला आहे.
‘मिहान’ परिसरात पहिल्या टप्प्यात १३२ एकरांवर ‘कॅम्पस’ विकसित करण्यात आला आहे. येथे प्रशस्त वर्गखोल्या बांधण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांचे वसतिगृह व डायनिंग हॉलदेखील प्रशस्त आहेत. विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ‘ओपन एअर ऑडिटोरिअम’ बांधण्यात आले आहे. या सुविधांसह पर्यावरणपूरकतेकडेदेखील लक्ष देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ५० किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येत असून पुढील टप्प्यात ३ हजार किलोवॅट क्षमता वाढविण्यात येणार आहे.
‘झिरो डिस्चार्ज’ धोरणाची अंमलबजावणी
‘आयआयएम-नागपूर’च्या परिसरात जलसंवर्धनाबाबत विशेष पावले उचलण्यात आली आहे. छतावरील पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी १४ ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग वेल्स’ तयार करण्यात आला आहे. सोबतच दोन कृत्रिम जलाशयांमध्ये परिसरातील पाणी जमा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात ६ विहिरी होत्या. त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून जलस्वयंपूर्णतेकडे हे पाऊल असल्याचे मत ‘आयआयएम-नागपूर’चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी व्यक्त केले.
तापमान कमी करण्यासाठी ‘क्लेटन टाईल्स’
- बाह्य दर्शनी भागात ‘क्लेटन टाईल्स’चा वापर केल्याने इमारतीचा बाह्य दर्शनी भाग आणि भिंतीमध्ये ५० मिमी अंतर निर्माण झाले आहे. त्यामुळे अंतर्गत तापमान कमी होण्यास मदत होते.
- इमारतीच्या आतील तापमान कमी करण्यासाठी ‘क्लेटन टाईल्स’सह बाह्य दर्शनी भागात डबल ग्लास युनिटचा वापर करण्यात आला आहे.
- ॲडमिन, फॅकल्टी आणि शैक्षणिक ब्लॉक्सदरम्यान ‘एसीपी क्लेडिंग’सह स्ट्रक्चरल फ्रेमचा वापर केल्याने ऊन व पावसातदेखील सहजपणे जाणे-येणे करता येणार आहे.
- ‘टॅक्टाईल टाईल्स’ व रॅम्प असल्याने दिव्यांगांना फिरण्यात सुलभता.