आयआयएम-नागपूर उभारणार देशातील सर्वात मोठा इनोव्हेशन-रिसर्च पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 03:24 PM2022-03-15T15:24:56+5:302022-03-15T15:28:22+5:30
प्रस्तावित पार्क हा ‘आयएनएफईडी’च्या (आयआयएम नागपूर फाऊंडेशन फॉर एन्ट्रोप्रेनरशिप डेव्हलपमेन्ट) विस्ताराचा भाग असेल.
संदीप दाभेकर
नागपूर : ‘आयआयएम-नागपूर’तर्फे ६० एकर परिसरात देशातील सर्वात मोठा इनोव्हेशन आणि रिसर्च पार्क उभारण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असेल, असे संस्थेचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी स्पष्ट केले.
आम्ही नागपुरात देशातील सर्वात मोठे इनोव्हेशन आणि रिसर्च पार्क उभारण्याची योजना आखत आहोत. रिसर्च पार्कची संकल्पना आयआयटी चेन्नईने आणली होती. आम्हाला एक पाऊल पुढे जायचे आहे आणि सेटअपमध्ये ‘इनोव्हेशन’चादेखील समावेश करायचा आहे, असे मेत्री यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित पार्क हा ‘आयएनएफईडी’च्या (आयआयएम नागपूर फाऊंडेशन फॉर एन्ट्रोप्रेनरशिप डेव्हलपमेन्ट) विस्ताराचा भाग असेल. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनदेखील या प्रकल्पासाठी सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या वतीने, व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी यांनी राज्य सरकारला तसेच ‘एमएडीसी’चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना या प्रकल्पासाठी ५० ते ६० एकर जागेची आवश्यकता असल्याचे पत्र लिहिले आहे, अशी माहिती मेत्री यांनी दिली.
‘एमएडीसी’ या प्रस्तावाबाबत सकारात्मक असून त्यांची मार्केटिंग एजन्सी ‘आयआयएम’च्या प्रस्तावाचे मूल्यांकन करेल. तसेच, ‘आयआयएम’ची चमू २९ मार्च रोजी कपूर यांना सादरीकरण करणार आहे.
कंपन्यांसाठी सायबर स्पेस
या पार्कच्या माध्यमातून मिहानमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांसाठी भौतिक व सायबर स्पेस तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्कच्या माध्यमातून विविध उद्योगांना मिहानकडे आकर्षितदेखील करता येईल, असा विश्वास मेत्री यांनी व्यक्त केला.
भविष्यात कायमस्वरूपी नोकऱ्या नाहीशा होणार आहेत, तात्पुरत्या नोकऱ्या वाढतील आणि एक व्यक्ती अनेक कंपन्यांसाठी काम करेल. या परिस्थितीसाठी लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी पार्क सायबर तसेच भौतिक जागा तयार करेल. कंपन्या पार्कमध्ये त्यांची संशोधन आणि विकास केंद्रे स्थापन करू शकतील तसेच आमचे तज्ज्ञ व प्राध्यापक सदस्य मार्गदर्शन करतील, असे मेत्री यांनी सांगितले. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, व्हीएनआयटी, आयआयआयटी आणि पीडीकेव्ही या विविध संस्थांमध्ये उद्योगसज्ज प्रतिभा उपलब्ध करून देण्याचेदेखील उद्दिष्ट आहे.