आयआयएम नागपूर संशाेधनाचे हब ठरेल : डाॅ. मेत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:09 AM2021-04-28T04:09:59+5:302021-04-28T04:09:59+5:30
नागपूर : दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर ही देशातील १४ वी आयआयएम संस्था आहे. पण अनेक अर्थाने ...
नागपूर : दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर ही देशातील १४ वी आयआयएम संस्था आहे. पण अनेक अर्थाने पहिली ठरेल आणि २०१५ साली संस्थेच्या उद्घाटनापासून तसे वातावरण निर्माण केले आहे. आता नव्या नेतृत्वाखाली संस्थने येत्या पाच वर्षात देशातील टाॅप १० मध्ये येण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
आयआयएम नागपूरचे नवीन संचालक डाॅ. भीमराया मेत्री लाेकमतशी बाेलताना म्हणाले, भारताच्या हृदयस्थानी असण्याचा नागपूरला माेठा फायदा आहे. त्यामुळे आपले ज्ञान, काैशल्य, संपर्क आणि स्रोतांचा या संस्थेच्या, शहराच्या आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी उपयाेगात आणण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी आयआयएम तिरुचिरापल्ली, दिल्ली व एमडीआय गुरग्राममध्ये प्रयाेग केल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यास आणि संशाेधन हे विकासाचे दाेन महत्त्वाचे स्तंभ आहेत आणि नवीन संशाेधनाद्वारे समाजासाठी याेगदान देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आयआयएमएन फाऊंडेशन फाॅर एन्ट्रप्रिनरशीप डेव्हलपमेंट (इन एफईडी) ही अशीच एक महत्त्वाची सुरुवात असून, एमएसएमई आणि या भागातील शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एमएसएमईसाठी काैशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करणे लक्ष्य असून, अर्थचक्राच्या दृष्टीने ते महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पहिल्या लाटेत काेराेना शिखरावर असताना ऑक्टाेबर २०२० मध्ये डाॅ. मेत्री यांनी जबाबदारी सांभाळली. मात्र अशा कठीण काळातही २०१९-२० बॅचला १०० टक्के प्लेसमेंट देण्यात यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले. अनेक देशी-परदेशी कंपन्यांशी एमओयू साईन केल्याने येथील लघु उद्याेजकांना कॅनडापर्यंत व्यवसाय नेणे साेपे हाेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेम्फीस विद्यापीठाशी केलेल्या कराराचा त्यांनी उल्लेख केला. मेम्फीस हा कापूस उत्पादक देश आहे आणि विदर्भातही माेठ्या प्रमाणात कापूस हाेताे. त्यामुळे या कराराचा विदर्भाच्या कापूस अर्थचक्राला फायदा हाेण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे कॅम्पस मिहान एसईझेडमध्ये नेण्याची तयारी सुरू असून, काेराेनामुळे ते रखडल्याचे डाॅ. मेत्री यांनी स्पष्ट केले.
नवीन काेर्स सुरू हाेणार
आयआयएम नागपूरमध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, ज्याद्वारे नाेकरीपेशा लाेकांना त्यांचे करिअर पुढे नेता येईल. या शैक्षणिक सत्रात हा काेर्स सुरू करण्यात येईल. आठवड्यातून तीन दिवस याचे वर्ग हाेतील तसेच दाेन दिवस सायंकालीन वर्ग व रविवारी अर्धा दिवस सत्र राहणार असल्याचे डाॅ. मेत्री यांनी सांगितले. तीन वर्षाचा कार्यानुभव आणि एन्ट्रन्स टेस्ट उत्तीर्ण करावी लागेल. मेम्फीस विद्यापीठाच्या फेडएक्स संस्थेच्या सहकार्याने आणखी एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट फाॅर मायक्राे, स्माॅल ॲन्ड मिडियम उद्याेग (एनआय-एमएसएमई)शी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.