पाच वर्षांत साडेपाच लाखावर वृक्षांची अवैध तोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:04 PM2018-09-10T12:04:41+5:302018-09-10T12:06:05+5:30
मागील पाच वर्षांत तब्बल ५ लाख ६१ हजार ४१० वृक्षांची अवैधपणे तोड करण्यात आली असून, यामध्ये २ लाख ३४ हजार २१६ सागवान वृक्षांचा समवेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वृक्ष लागवड ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. वृक्ष लागवडीच्या अभियानाचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे. जंगल क्षेत्र वाढत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु दुसरीकडे जंगलात अवैध वृक्षतोडही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे. मागील पाच वर्षांत तब्बल ५ लाख ६१ हजार ४१० वृक्षांची अवैधपणे तोड करण्यात आली असून, यामध्ये २ लाख ३४ हजार २१६ सागवान वृक्षांचा समवेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागविली. त्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यालयाने दिलेली माहिती धक्कादायक आहे. २०१३ ते मार्च २०१८ यादरम्यान एकूण ५ लाख ६१ हजार ४१० वृक्ष अवैधपणे तोडण्याची आली आहे. यापैकी एकट्या सागवनाची झाडे २ लाख ३४ हजार २१६ इतकी आहेत. वर्षनिहाय विचार केल्यास २०१३ मध्ये एकूण १ लाख ३९ हजार ५६ झाडांची अवैध कटाई झाली. यात सागवान झाडांची संख्या ५४ हजार ४२९ इतकी होती. २०१४ मध्ये एकूण १ लाख २० हजार ५५१ झाडे तोडली गेली. यात ४७ हजार ९३५ सागवानांची झाडे होती. २०१५ मध्ये १ लाख ३ हजार ४१४ झाडे यात ४२ हजार ८०६ सागवानांची झाडे, २०१६ मध्ये ९६ हजार ६२६ झाडे यात ४२ हजार ७२६ सागवान झाडे तर २०१७ मध्ये ८० हजार ६७९ झाडे तोडण्यात आली. यात ३९ हजार ९७९ सागवानाच्या झाडांचा समावेश आहे. या पाच वर्षांत एकूण ३४ कोटी ५६ लाख ८५ हजार रुपये किमतीची ही झाडे आहेत.
यामध्ये एकट्या सागवान झाडांची किंमत २५ कोटी ९५ लाख इतकी आहे.
तीन महिन्यात २०,५५४ झाडे तोडली
२०१८ मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत तब्बल २०,५५४ झाडे तोडण्यात आली. यामध्ये १०,३४१ झाडे ही सागवानाची आहेत. म्हणजे तीन महिन्यातच दीड कोटी रुपये किमतीची झाडे तोडली गेली. यात एकट्या सागवान झाडांची किंमतच सव्वा कोटीच्या जवळपास आहे.