मिहानमध्ये अवैध उत्खनन : दीड कोटींचा मुरूम चोरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 11:06 PM2021-01-21T23:06:09+5:302021-01-21T23:08:28+5:30

Illegal excavation in Mihan, Crime news मिहानमधील भारतीय कंटेनर निगम डेपोच्या हद्दीतील दीड कोटींच्या मुरुमाचे कंत्राटदाराने अवैध उत्खनन केले. ही बाब उघड झाल्यानंतर कंपनीतर्फे सोनेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली.

Illegal excavation in Mihan: Soft stones worth Rs 1.5 crore stolen | मिहानमध्ये अवैध उत्खनन : दीड कोटींचा मुरूम चोरला

मिहानमध्ये अवैध उत्खनन : दीड कोटींचा मुरूम चोरला

Next
ठळक मुद्दे आदित्य एन्टरप्रायजेसच्या मालकावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मिहानमधील भारतीय कंटेनर निगम डेपोच्या हद्दीतील दीड कोटींच्या मुरुमाचे कंत्राटदाराने अवैध उत्खनन केले. ही बाब उघड झाल्यानंतर कंपनीतर्फे सोनेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी आदित्य एन्टरप्रायजेसचा मालक नीलेश आकरे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. संजय श्रीराम नलावडे (रा. मुंबई) यांनी सोनेगाव पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीनुसार, कंटेनर निगमचे मेसर्स दास यांना तेवर ब्लॉक डेव्हलपमेंटचे काम देण्यात आले होते. त्यासाठी पोकलॅन, जेसीबी, डांबर मिक्सर आदी वाहने कंटेनर डेपोच्या आतमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली होती. आतमध्ये गट्टू बसविण्याचे काम सुरू करतानाच मुरूम उत्खननही करण्यात आले. ते काम आरोपी आकरेच्या मेसर्स आदित्य एन्टरप्रायजेसला देण्यात आले होते. ४ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२० या कालावधीत आरोपी आकरेने आपल्या माणसांकरवी एक कोटी, ३७ लाख, ९० हजारांच्या मुरुमाचे अवैध उत्खनन केेले. यासंदर्भात मेसर्स दास यांच्याकडून लेखी पत्र देऊन मुरुम उत्खनन करण्यास मनाई करूनही त्याने दुसऱ्या भागातील मुरुम काढला अन् त्याची विल्हेवाट लावली. प्रत्यक्षात एवढे करूनही मुरुमाचे जे काम होते ते पूर्ण केले नाही. यासंदर्भात कंपनी आणि कंत्राटदारांमधील वाद अनेकदा चर्चा करूनही सुटला नाहीत. त्यामुळे कंपनीतर्फे नलावडे यांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरी आणि फसवणुकीचे कलम ३७९, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

तहसीलदाराचाही अहवाल घेणार

वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती. या संबंधाने सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. या प्रकरणात मुरुमाच्या संबंधाने तहसीलदाराचाही अहवाल घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Illegal excavation in Mihan: Soft stones worth Rs 1.5 crore stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.