नागपूर जिल्ह्यात बनवाडी गावाजवळ बिनधास्त अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 10:50 AM2020-06-04T10:50:13+5:302020-06-04T10:50:42+5:30
नागपूरपासून जवळपास २० किमी अंतरावर असलेल्या वर्धा रोडवरील बनवाडी गावाजवळ मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केले जात आहे. विशेष म्हणजे, या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही.
धीरज शुक्ला।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरपासून जवळपास २० किमी अंतरावर असलेल्या वर्धा रोडवरील बनवाडी गावाजवळ मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केले जात आहे. विशेष म्हणजे, या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही.
बनवाडी गावाजवळील डोंगराळ भागात पोकलॅण्ड आणि जेसीबी मशीनद्वारे खोदकाम केले जात आहे. त्यामुळे, हा भाग मैदानात रूपांतरित झाला असून, या भागाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. हे कृत्य भूखंड माफियांना कशाचीच भीती उरलेली दिसत नाही. या उत्खननात डोंगरांसोबतच शेकडो वृक्षांची नासाडी झाल्याने पर्यावरणाबाबतीत या माफियांची उदासीनता प्रकर्षाने दिसून येते. सत्यता तपासण्यासाठी ‘लोकमत’ची चमू घटनास्थळी पोहोचल्यावर प्रकरण अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. बनवाडी गाव ते नवरमारी गावापर्यंत एक कच्चा रस्ता आहे आणि हा भाग वनराजी व भूसंपदेने नटलेला आहे. सामान्यत: या मार्गावर रहदारी कमीच असते. बनवाडीपासून दोन किलोमीटर पुढे गेल्यावर डोंगरांवर मुरुम आणि दगडांसाठी खोदकाम सुरू असल्याचे नजरेस पडते. यासाठी अवैध उत्खनन करणाऱ्यांनी एक स्वतंत्र रस्ताच बनवला आहे. बनवाडी-नवरमारीच्या मार्गावर अशा प्रकारचे उत्खनन दिसून येते. मात्र, डोंगरांकडे वळल्यास मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याचे स्पष्ट होते. जेसीबी आणि पोकलॅण्डद्वारे सातत्याने खोदकाम केले जात आहे. एकापाठोपाठ अनेक डम्पर येतात आणि जाताना दिसतात. या प्रकरणामुळे शासन-प्रशासनाला कोट्यवधी रुपयांच्या राजस्वापासून अलिप्त राहावे लागल्याचेही समजून येते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरापासून रात्रंदिवस हे अवैध उत्खनन सुरू आहे. एक डम्पर मुरुम किंवा दगडांसाठी चार हजार रुपये वसूल केले जातात. अनेक ठेकेदार इथूनच मुरुम व दगड घेऊन जात आहेत.
या प्रकरणाबाबत कोणतीच तक्रार आमच्याकडे आलेली नाही. अशी तक्रार प्राप्त होताच तात्काळ कारवाई केली जाईल.
- मिलिंद बऱ्हानपूरकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी नागपूर
बनवाडी, नवरमारी परिसरात अवैध उत्खनन सुरू असल्याची कोणतीही लेखी तक्रार आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. तुमच्या माध्यमातूनच अशा प्रकारचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. याबाबत कुणी तक्रार केलीच तर कारवाई नक्की करू.
- मोहन टिकले, तहसीलदार, नागपूर ग्रामीण