नंदापूर शिवारात रेतीचा अवैध उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:39 AM2021-02-05T04:39:46+5:302021-02-05T04:39:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : नंदापूर (ता. सावनेर) शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रातून माेठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : नंदापूर (ता. सावनेर) शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रातून माेठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात असून, याच रेतीची परिसरातून ओव्हरलाेड वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळे एकीकडे शासनाचा लाखाे रुपयांचा महसूल बुडत असून, दुसरीकडे रस्त्यांची दैनावस्था झाल्याने ते पायी चालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. या प्रकाराकडे महसूल विभागातील अधिकारी मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप या भागातील नागरिकांनी केला आहे.
बाजारात कन्हान नदीतील तांबड्या रेतीचा चांगली मागणी असल्याने रेतीतस्कारांनी या नदीच्या विविध घाटांना लक्ष्य केले आहे. वास्तवात, नागपूर जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नसताना बहुतांश घाटांमधून रेतीचा सतत अवैध उपसा केला जात असून, त्या रेतीची वाहतूकही केली जात आहे. काही रेतीतस्कर नदीच्या पात्रातील रेतीची उचल करून ती निर्जन ठिकाणी माेठ्या प्रमाणात साठवून ठेवते. त्यानंतर मागणीप्रमाणे त्या साठ्यातील रेतीची उचल करते.
दाेन वर्षांपासून समाधानकारक पाऊस बरसत असल्याने कन्हान नदीत पुरासाेबत माेठ्या प्रमाणात रेती वाहून आली आहे. पात्रातील हा रेतीसाठा खुलेआम चाेरून नेत असून, शासनाला राॅयल्टी मिळत नसल्याने लाखाे रुपयांचे नुकसानही सहन करावे लागत आहे. नंदापूर शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात रात्रंदिवस रेतीचा उपसा केला जात असून, त्या रेतीची वाहतूक करण्यासाठी पात्रात २० ते २२ ट्रॅक्टर हमखास दिसतात. ही रेतीचाेरी महसूल व पाेलीस विभागाच्या आशीर्वादाने हाेत असल्याचा आराेप नागरिकांनी केला असून, याला आळा घालण्याची मागणी केली आहे.
...
सुसाट वाहनांमुळे भीतीचे वातावरण
रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारे ट्रॅक्टर ओव्हरलाेड राहात असून, ते सुसाट वेगाने धावतात. या ट्रॅक्टरच्या वेगामुळे राेडने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, राेडवर खड्डे तयार झाले असून, ते पायी चालण्याच्याही लायकीचे राहिले नाहीत. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग या राेडची दुरुस्ती करायला तयार नाही, असा आराेपही नागरिकांनी केला असून, खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावल्याचे त्यांनी सांगितले.