उनगाव, चिकणा घाटात रेतीचा अवैध उपसा, महसूल व पाेलीस विभाग गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 01:25 PM2021-12-22T13:25:56+5:302021-12-22T13:29:42+5:30

रेतीच्या व्यवसायात कमी गुंतवणुकीत प्रचंड पैसा मिळत असल्याने, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांचे हस्तक या व्यवसायात उतरले आहेत.

Illegal extraction of sand in Ungaon, Chikana Ghat | उनगाव, चिकणा घाटात रेतीचा अवैध उपसा, महसूल व पाेलीस विभाग गप्प

उनगाव, चिकणा घाटात रेतीचा अवैध उपसा, महसूल व पाेलीस विभाग गप्प

Next
ठळक मुद्देकाेट्यवधींच्या महसुलावर पाणी

सुदाम राखडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कामठी तालुक्यातील कन्हान नदीवरील १३ पैकी उनगाव आणि चिकणा या दाेन रेतीघाटांचे लिलाव करण्यात आले आहेत. या दाेन्ही घाटात नियमबाह्य पद्धतीने २४ तास प्रमाणाबाहेर रेतीचा उपसा केला जात आहे. राॅयल्टीपेक्षा अधिक रेतीची उचल केली जात असल्याने, राज्य सरकारला काेट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी साेडावे लागत आहे. ही बाब तालुक्यातील महसूल आणि पाेलीस विभागातील अधिकाऱ्यांना माहीत असूनही ते गप्प असल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

घाटांमधून रेतीचा उपसा करण्यासाठी सरकारच्या वतीने घाटधारकांना विशिष्ट नियमावली दिली जाते. मात्र, उनगाव व चिकणा घाटात या नियमांची पायमल्ली करीत रात्रभर पाेकलॅण्ड व जेसीबी मशीनद्वारे रेतीचा उपसा केला जात असून, ती रेती टिप्पर व ट्रकने सुरक्षितस्थळी नेली जाते. तालुक्यात रेतीसाेबतच मातीचेही अवैध खाेदकाम करून ती माेठ्या प्रमाणात चाेरून नेली जाते. रेती आणि माती चाेरट्यांचे कामठी व माैदा तालुक्यातील लाेकप्रतिनिधींसाेबत आर्थिक लागेबांधे असल्याने त्यांच्या विराेधात प्रभावी कारवाई केली जात नाही.

रेतीच्या व्यवसायात कमी गुंतवणुकीत प्रचंड पैसा मिळत असल्याने, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांचे हस्तक या व्यवसायात उतरले आहेत. ते उपसा केलेली रेती सुरक्षितस्थळी साठवून ठेवतात आणि साेयीने नागपूर व इतर शहरात विक्रीला पाठवितात. त्यामुळे कामठी तालुक्यातील घाटांच्या परिसरात रेतीचे माेठमाेठे ढीग दिसून येतात. राजकीय दबावामुळे प्रभावी कारवाई करणे शक्य हाेत नसल्याने, महसूल व पाेलीस विभागातील अधिकारीही चिरीमिरी घेऊन रेती व मातीच्या वाहतुकीची वाहने साेडून देतात.

नागरिक आक्रमक

या दोन्ही घाटांमधील रेतीचा उपसा आणि अहोरात्र होणाऱ्या ओव्हरलोड उपसा वाहतुकीमुळे या भागातील नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी वतीने महिनाभरापूर्वी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात उनगाव मावली घाटाची पाहणी केली होती. त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले होते. चकणा त्यामुळे पोलिसांनी त्या घाटात छापा टाकून पोकलॅण्ड मशीन जप्त केली होती. मात्र, या कारवाईचा फारसा उपयोग झाला नाही.

 

लोकप्रतिनिधींचा दुटप्पीपणा

अवैध रेती उपशाला राजकीय पाठबळ आहे. त्यामुळे रेतीचोरीला आळा घालणे महसूल व पोलीस विभागाला कठीण जात आहे. एखादवेळी कारवाई केल्यास ती टाळण्यासाठी किया कमीतकमी दंडाची आकारणी करण्यासाठी राजकीय दबावतंत्रही वापरले जाते. यात कामठी व मौदा तालुक्यातील लोक प्रतिनिधी आघाडीवर आहेत. यावरून लोकप्रतिनिधींचा दुटप्पीपणा स्पष्ट होतो.

रॉयल्टीचा वारंवार वापर

कन्हान नदीवरील कामठी तालुक्यातील वारेगाव, बिना, नेरी, भामेवाडा | यासह अन्य रेतीघाटाचा लिलाव झाला नसताना याही घाटामधून रेतीचा अवैध उपसा अहोरात्र केला जात आहे. चोरटे रेती व माती वाहतुकीच्या एका रॉयल्टीचा वापर वारंवार केला जात असून, ट्रक व टिप्परमध्ये रॉयल्टी व क्षमतेपेक्षा अधिक रेती व मातीची वाहतूक केली जात आहे. यात राजकीय नेत्यांचे रेतीचोर हस्तक आघाडीवर आहेत.

Web Title: Illegal extraction of sand in Ungaon, Chikana Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.