तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी, दोन बोटी, १६५ मासेमारीच्या जाळी जप्त
By दयानंद पाईकराव | Published: July 8, 2024 07:54 PM2024-07-08T19:54:59+5:302024-07-08T19:55:44+5:30
विशेष व्याघ्र संरक्षण दलाची कारवाई : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या मगर नाला, जामुन नाला परिसरातील घटना
नागपूर: पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोतलाडोह धरणात अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या दोन बोटी आणि १६५ मासेमारीच्या जाळी विशेष व्याघ्र संरक्षण दलाने (एसटीपीएफ) जप्त केल्या आहेत.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोतलाडोह धरणात मासेमारी करण्यास मनाई आहे. तरी देखील मासेमार या धरणात मासेमारी करीत असतात. या मासेमारांवर विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या वतीने विशेष लक्ष पुरविण्यात येते. ‘एसटीपीएफ’च्या पथकाने ६ आणि ७ जुलै २०२४ रोजी धाडसी मोहिम राबवून मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन बोटींसह १६५ जाळ्या जप्त केल्या. ६ जुलै रोजी पथकाने तोतलाडोह धरणातील मगर नाला आणि जामुन नाला भागात मोहिम राबवून एक बोट, १२० मासेमारीच्या जाळ्या, दोन ट्युब आणि एक सायकल जप्त केली.
दुसऱ्या दिवशी ७ जुलै रोजी मगर नाला परिसरात केलेल्या कारवाईत पथकाने एक बोट, एक नळी आणि ४५ मासेमारीच्या जाळी जप्त केल्या. तोतलाडोह धरणातील मेघदूत हे जलाशय पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात वसलेले आहे. या क्षेत्रातील जैवविविधता अबाधित राखण्यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल नेहमची महत्वाची भूमिका बजावत असते. वन्यजीव संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणे आणि नैसर्गिक साधनसामुग्रीचे जतन करणे यातही विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे कार्य कौतुकास्पद आहे.
‘अवैध मासेमारी रोखण्यासाठी ‘एसटीपीएफ’च्या वतीने दिवस-रात्र गस्त घालण्यात येते. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता टिकवून ठेवण्यात विशेष व्याघ्र संरक्षण दलाची भूमिका महत्वाची आहे.’
-डॉ. प्रभुनाथ शुक्ला, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प