उपराजधानीत अवैध सावकारांची पिलावळ वळवळतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 10:48 AM2019-08-08T10:48:48+5:302019-08-08T10:51:12+5:30

अवैध सावकारीचे जाळे उपराजधानीतील गल्लीबोळापासून पॉश बंगल्यांपर्यंत आणि छोट्या टपरीवाल्यांपासून तो मोठमोठे व्यवसाय करणारांपर्यंत सर्वांच्या अवतभवती विणलेले दिसते.

Illegal lenders are activate in Nagpur | उपराजधानीत अवैध सावकारांची पिलावळ वळवळतेय

उपराजधानीत अवैध सावकारांची पिलावळ वळवळतेय

Next
ठळक मुद्देकर्जदारांभोवती मृत्यूचा पाश अनेकांचा जीव लागलाय टांगणीला

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुंडांच्या बळावर निरंकुश झालेले मस्तवाल अवैध सावकार कर्जदारांना मृत्यूच्या जबड्यात ढकलत आहेत. सोकावलेले सावकार आणि त्यांच्या पोसलेल्या गुंडांकडून होणारा त्रास असह्य झाल्यामुळे अवघ्या दोन महिन्यात एका फिल्म प्रोड्यूसरसह दोघांनी आत्महत्या केली तर, अवैध सावकारी करणाऱ्यांनी दोघांची हत्या केली. मस्कासाथ मधील एका व्यापाऱ्याभोवतीही सोकावलेले सावकार असाच पाश आवळत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
अवैध सावकारीचे जाळे उपराजधानीतील गल्लीबोळापासून पॉश बंगल्यांपर्यंत आणि छोट्या टपरीवाल्यांपासून तो मोठमोठे व्यवसाय करणारांपर्यंत सर्वांच्या अवतभवती विणलेले दिसते. जशी व्यक्ती, तसा सावकार आणि जशी गरज तशी कर्जाची रक्कम असे या सावकारीचे स्वरूप आहे. त्यांच्या व्याजाचा दरही वेगवेगळा आहे. कुणी कोट्यवधींची मालमत्ता गहाण ठेवून लाखोंचे कर्ज घेत असेल तर त्यासाठी त्या सावकाराचे दर वेगळे असतात. तर, छोटे मोठे, व्यावसायिक, कंत्राटदार आणि इतर व्यक्ती वैयक्तिकरीत्या कर्ज घेत असेल तर त्या भागातील सावकाराचे व्याजदर वेगळे आहेत. एका महिन्याला दोन टक्क्यापासून तो ७० टक्क्यापर्यंत सोकावलेले सावकार व्याज वसूल करतात. त्यासाठी कर्ज देताना ते कर्जदाराचे घर, शेती, दुकान, भूखंड किंवा वाहन (कागदपत्रे) स्वत:कडे ठेवून घेतात. काहीच नसेल तर कर्जदाराचा जीव गहाण ठेवल्यागत ते त्याच्यामागे वसुलीसाठी तगादा लावतात. त्याचे अपहरण करणे, घरी जाऊन परिवारातील सदस्यांसमोर अपमानित करणे, मारहाण करणे, धमक्या देणे, असे सर्व प्रकार चालतात. गुंडांच्या बळामुळे सोकावलेले सावकार त्याच्या भागातील पोलिसांसोबतही चांगले संबंध ठेवतात. त्यामुळे ते प्रसंगी कर्जदाराच्या गळ्याभोवती मृत्यूचा पाश आवळण्यासाठीही मागेपुढे पाहत नाहीत. त्याच्याविरुद्ध तक्रार द्यायला गेल्यास पोलीसही फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे कर्जदारासमोर मृत्यूला कवटाळण्याखेरीज दुसरा पर्याय उरत नाही. उपराजधानीत २२ जुलै ते ३१ जुलै या ९ दिवसात सावकारांच्या जाचाला कांटाळून दोघांनी आत्महत्या केली. सावकारांच्या या पिलावळीने दोन महिन्यात दोघांची हत्याही केली.
कोतवाली : झोपडपट्टीतील जुगारी तसेच गरजूंना किरकोळ रक्कम उधार देऊन त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने व्याज वसूल करणारा कुख्यात गुंड रितेश शिवरेकर याने आपल्या साथीदारांच्या मदतीने आनंद प्रभाकर शिरपूरकर नामक तरुणाची निर्घृण हत्या केली. मदतीला धावलेला आनंदचा मित्र प्रवीण चंद्रदर्शन रंगारी यालाही आरोपींनी गंभीर जखमी केले. २९ जुलैच्या रात्री गंगाबाई घाटाजवळच्या गुजरनगर झोपडपट्टीत हा गुन्हा घडला होता. आनंद अवैध सावकारीत अडसर बनल्याचे लक्षात आल्यामुळेच कुख्यात रितेश आणि साथीदारांनी त्याची हत्या केली.
तहसील : मेडिकल स्टोर्सची साखळी निर्माण करणारे व्यावसायिक आणि नंतर फिल्म प्रोड्युसर म्हणून नावारुपाला आलेल्या विनोद रामानी यांनी अखेर सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. रामानी अवैध सावकारी करणाऱ्यांना महिन्याला ४० ते ४५ लाख रुपये नुसते व्याज देत होते. तरीसुद्धा कालू चंदानी, पंजू दास तसेच त्यांचे साथीदार रामानींना प्रचंड मानसिक त्रास देत होते. त्यामुळे अखेर रामानीने गळफास लावून घेतला. २२ जुलैला ही घटना उघडकीस आली. तेव्हापासून तपासाच्या नावाखाली पोलीस काय करत आहे, हाच स्वतंत्र तपासाचा विषय ठरला आहे.
यशोधरानगर : कामठी मार्ग, भिलगाव येथील आदित्य विनोद भुताड (वय २९) यांनी आरोपी प्रणय गायकवाड (रा. भिलगाव) कडून एक महिन्याच्या बोलीवर ५० हजार रुपये उधार घेतले होते. त्या बदल्यात आरोपी केवळ एका महिन्यात व्याजासह ८५ हजार रुपये परत मागत होता. आर्थिक कोंडीमुळे रक्कम परत करण्यास असमर्थ असलेल्या आदित्यला आरोपी प्रणय वारंवार धमक्या देत होता. मारहाणही करत होता. त्याच्याकडून होणारा अपमान आणि जाच असह्य झाल्याने ३० जुलैला दुपारी आदित्यने विष प्राशन केले. ३१ जुलैला उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
हुडकेश्वर : छोटे मोठे कंत्राट घेऊन समाजात उभे होण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीकांत वंजारी या कंत्राटदाराने कुख्यात गुंड शैलेश केदारे याच्याकडून काही रक्कम उधार घेतली होती. नमूद मुदतीत व्याज आणि कर्जाची काही रक्कम त्याने केदारेला दिलीही होती. मात्र, व्याज फुगवत आणखी १ लाख, ७० हजार रुपये पाहिजे, असा तगादा लावून आर्थिक कोंडीत असलेल्या वंजारीचे केदारे आणि त्याच्या गुंडांनी अपहरण केले. त्याला बेदम मारहाण केली. परिणामी वंजारीचा मृत्यू झाला.

Web Title: Illegal lenders are activate in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.