अवैध सावकारी : कुख्यात फातोडे बापलेक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:11 PM2020-09-12T23:11:34+5:302020-09-12T23:13:39+5:30
नागपुरातील अट्टल गुन्हेगार संजय रामोजी फातोडे (वय ४०) आणि त्याचा मुलगा रजत (वय २२) या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील अट्टल गुन्हेगार संजय रामोजी फातोडे (वय ४०) आणि त्याचा मुलगा रजत (वय २२) या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या घरातून अवैध सावकारीची कागदपत्रे, रेव्हेन्यू स्टॅम्पवर सह्या घेतलेले अनेक कोरे कागद तसेच दोन ऑटो आणि पाच दुचाक्यासह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
संजय फातोडे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी मकोका, हद्दपारी आणि एमपीडीएचीही कारवाई झाली आहे. मात्र त्याच्या गुन्हेगारी वृत्तीत फरक पडलेला नाही. फातोडेचा मुलगा रजत हासुद्धा गुन्हेगारीत सक्रिय असून तो अवैध सावकारी करतो. फातोडे बापलेकांनी मानकापूर परिसरात राहणारे विकास नारायण मेश्राम (वय ३९) यांना सलूनच्या व्यवसायाकरिता ५० हजार रुपये व्याजाने दिले होते. त्याच्याकडून महिन्याला तीस टक्के व्याज आरोपी घेत होते. मेश्राम यांनी आतापर्यंत फातोडेला २२ हजार रुपये परत केले होते. लॉकडाऊनमुळे सलूनचा व्यवसाय पूर्ण ठप्प झाल्याने मेश्राम आरोपीला व्याजाचे पैसे देऊ शकला नाही. त्यामुळे आरोपी संजय आणि रजत फातोडे काही दिवसापूर्वी मेश्रामच्या दुकानात गेले आणि त्याला शिवीगाळ करून धमकी देऊ लागले. त्यांनी मेश्रामचे दुकानातील सलून चेअर, सोफा जबरदस्तीने उचलून नेले. मेश्रामने त्याची तक्रार गुन्हे शाखेत नोंदवली. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २चे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर, सहायक पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबूसकर, पुरुषोत्तम मोहेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी फातोडे विरुद्ध कारवाईचा फास आवळला. संजय आणि रजत फातोडेला अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा १४ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. त्यांच्या पांढराबोडीतील घर आणि कार्यालयाची झडती घेऊन पोलिसांनी अवैध सावकारीची कागदपत्रे, दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, गहाण ठेवलेले दोन ऑटो, पाच दुचाक्या असा एकूण ७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पीडितांना आवाहन
फातोडे बापलेकाच्या पिळवणुकीला अनेक जण बळी पडले आहेत. त्यांच्या जाळ्यात व्यावसायिक आणि गरीब नागरिकच नाही तर कॉलेजचे विद्यार्थीही अडकल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा पीडितांनी तक्रारीसाठी गुन्हे शाखेत संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.