लाॅकडाऊनमध्ये अवैध दारू निर्मितीला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:31+5:302021-04-24T04:08:31+5:30
विजय भुते लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : तालुक्यातील काही भागात आधीच माेहफुलाची दारू निर्मिती आणि अवैध विक्री केली जायची. ...
विजय भुते
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : तालुक्यातील काही भागात आधीच माेहफुलाची दारू निर्मिती आणि अवैध विक्री केली जायची. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा करताच या दारूच्या निर्मिती आणि विक्रीला उधाण आले आहे. या अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पारशिवनी पाेलिसांच्या पथकांनी अनेकदा धाडी टाकून माेहफुलाच्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. मात्र, याला पाहिजे तसा आळा बसला नाही.
तालुक्याचा काही भाग जंगलव्याप्त असून, शिवारातील झुडपांआड माेठ्या प्रमाणात माेहफुलाच्या दारूभट्ट्या आढळून येतात. पाेलिसांसह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा काेराेना संक्रमण राेखण्याच्या कामात गुंतली असताना, याचा फायदा माेहफुलाची दारू उत्पादक, वाहतूकदार व विक्रेते घेत आहेत. शिवाय, ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये तसेच लाॅकडाऊनमुळे संपूर्ण बाजारपेठ बंद असताना माेहफुलाच्या दारूच्या मागणीत वाढ झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बनेरा, तर पारशिवनी पाेलिसांच्या पथकाने साटक शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्ट्या धाड टाकून उद्ध्वस्त केल्या. या दाेन्ही कारवाया नुकत्याच करण्यात आल्या. पाेलीस अधुनमधून धाडी टाकून कारवाई करीत असले तरी, धाडीनंतर लगेच दुसऱ्या भागात दारूभट्ट्या तयार करून माेहफुलाच्या दारूचे उत्पादन केले जाते. या अवैध दारूविक्रीच्या धंद्यात बिअरबार आणि दारूच्या दुकानांमध्ये काम करणारे काही कामगार गुंतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...
दारूचे उत्पादन व विक्रीची गावे...
पारशिवनी तालुक्यातील साटक, बनेरा, नयाकुंड, चिचोली, घाटरोहना, वाघोडा, ईटगाव या गावांच्या शिवारात माेहफुलांच्या दारूचे माेठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. ही माेहफुलाची दारू पारशिवनी, कन्हान, साटक, कांद्री, नयाकुंड, निंबा, सालई, दहेगाव या गावांमध्ये नागपूर, सावनेर, कामठी यांसह अन्य शहरात विक्रीसाठी पाठविली जाते. माेहफुलांच्या दारूसाेबतच या भागात देशी दारूची माेठ्या प्रमाणात अवैध विक्री आणि वाहतूक केेली जाते. माेहफूल व देशी दारूची वाहतूक सहसा मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत केली जाते.
...
दारू पिण्याचा हव्यास घातक
पारशिवनी शहरातील काही भागात राेज सकाळी ५ पासून अवैध दारूविक्रीला सुरुवात हाेते. दारू पिणारे अवैध दारूविक्रेत्यांच्या घरासमाेर गाेळा हाेतात. ते मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासह अन्य काेणत्याही उपाययाेजनांचे पालन करण्याच्या भरीस पडत नाहीत. याबद्दल त्यांना कुणी सांगतही नाही. दारू पिण्याचा आणि अवैध दारूविक्रीतून पैसा कमावण्याचा हव्यास हा इतरांसाठी घातक ठरत आहे.