अवैध मद्यविक्री : राज्य उत्पादनशुल्क खात्याकडून नऊ महिन्यांत अठराशेहून अधिक गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 09:51 PM2019-03-22T21:51:53+5:302019-03-22T21:53:10+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन शुल्क खात्यातर्फे अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाईचा वेग वाढला आहे. अवघ्या नऊ महिन्यांत विविध प्रकारचे अठराशेहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. तर पंधराशेहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन शुल्क खात्यातर्फे अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाईचा वेग वाढला आहे. अवघ्या नऊ महिन्यांत विविध प्रकारचे अठराशेहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. तर पंधराशेहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे विचारणा केली होती. यंदाच्या आर्थिक वर्षात गोळा झालेला महसूल, एकूण उद्दिष्ट तसेच अवैध मद्यविक्रीविरोधात झालेली कारवाई तसेच संबंधित बाबींसंदर्भात माहिती विचारण्यात आली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१६-१७ मध्ये अवैध मद्यविक्रीसाठी २ हजार २१ गुन्हे दाखल झाले होते व १ हजार १९५ आरोपींना अटक झाली होती. तर २०१७-१८ मध्ये २ हजार ३४१ गुन्हे दाखल झाले व १ हजार ७५६ जणांना अटक झाली. २०१८-१९ च्या पहिल्या नऊ महिन्यांतच विविध प्रकारचे १ हजार ८१६ गुन्हे दाखल झाले व १ हजार ५३६ आरोपींना अटक करण्यात आली. कारवायांमध्ये ९८ वाहने तर १ कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमालदेखील जप्त झाला. यात हातभट्टी, विविध रसायने, देशी दारू, विदेशी मद्य, बनावट स्पिरीट, परराज्यातून येणारे विदेशी मद्य, मोहफुलाची दारू, ताडी इत्यादींचा समावेश आहे.
नऊ महिन्यांत ४० टक्के महसूल जमा
मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या महसुलाचे उद्दिष्ट वाढले आहे. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत उत्पादन शुल्क खात्याने ७५३ कोटी १८ लाख रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी डिसेंबर २०१८ पर्यंत प्रत्यक्षात ३०३ कोटी ३८ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ही रक्कम अवघी ४०.२८ टक्के इतकी होती. वर्षभरातील सर्वाधिक महसूल हा मार्च महिन्यात जमा होतो. त्यामुळे ही फरकाची आकडेवारी बदलण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी अधिक महसूलप्राप्ती
२०१६-१७ मध्ये नागपूर जिल्ह्यात ७७७ कोटी ११ लाखांचे उद्दिष्ट होते. यापैकी ५२१ कोटी ५० लाख (६७.११ टक्के) उद्दिष्ट गाठण्यात यश आले होते. २०१७-१८ मध्ये विभागाची कामगिरी फारच चांगली राहिली होती. त्या वर्षी ६०८ कोटी ५९ लाखांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ६६० कोटी ५३ लाखांचा महसूल जमा झाला होता. उद्दिष्टाच्या तुलनेत हा आकडा १०८.५३ टक्के इतका होता.