अवैध पार्किंगमुळे सदरमध्ये लागतो ट्रॅफिक जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:12 AM2021-09-17T04:12:08+5:302021-09-17T04:12:08+5:30
फोटो - संजय लचुरिया अवैध पार्किंगमुळे सदरमध्ये लागतो ट्रॅफिक जाम - आयकर भवन, स्मृती टाॅकीज चौक, सदर बाजारात लागतात ...
फोटो - संजय लचुरिया
अवैध पार्किंगमुळे सदरमध्ये लागतो ट्रॅफिक जाम
- आयकर भवन, स्मृती टाॅकीज चौक, सदर बाजारात लागतात वाहनांच्या रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधान चौकापासून काटोल रोड व पागलखाना चौकापर्यंत तयार झालेल्या उड्डाणपुलामुळे सदरमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. मात्र, वाहनांच्या अवैध पार्किंगची कोंडी अद्यापही सुटलेली नाही. मुख्य रस्त्याच्या दोन्ही अंगाला वाहनांच्या अवैधरीत्या होत असलेल्या पार्किंगमुळे येथून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहकांना सावध भूमिका घ्यावी लागते.
लिबर्टी टाॅकीज ते राजभवन
लिबर्टी टाॅकीजपासून ते राजभवनापर्यंतचा सदर मधील मार्ग वाहनांनी कायम व्यस्त असतो. या रस्त्यावर बरेच हॉटेल्स आहेत. येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कायम वाहनांचे अवैध पार्किंग असलेले दृश्य नजरेस पडते. त्यामुळे रस्ता निमुळता होतो. मोठ्या रुंदीची वाहने या रस्त्यावर आली तर दुचाकी, सायकलस्वार, कार यांची मोठीच अडचण होते.
मंगळवारी बाजार
मंगळवारी बाजार ही मोठी पेठ आहे. येथे विविध ऑफिसेस व प्रतिष्ठानांसोबत रेस्टेराँ, कापड विक्रीसोबतच भाजीबाजार भरतो. येथेही नो पार्किंगचे बोर्ड लागलेले आहेत. मात्र, त्याकडे सारासार दुर्लक्ष केले जाते. घाईगडबडीत असणारे ग्राहक कुठेही वाहन पार्क करतात. त्याचा परिणाम वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात होते.
गांधी चौक ते सदरचा मेन रोड
लहान-लहान गल्ल्या असलेल्या गांधी चौकापासून ते सदर मेन रोडपर्यंत अनेक छोटी-मोठी दुकाने आहेत. गल्ल्या अगदीच निमुळत्या आहेत. अनेक लोक येथे कुठेही वाहन पार्क करतात. याचा त्रास या भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना होतो.
आयकर भवन रोड
हॉटेल अशोकापासून पश्चिमेकडे निघणाऱ्या रस्त्यावर आयकर भवन आहे. येथे कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष पार्किंगची व्यवस्था आहे. सोबतच या भागात काही रेस्टेराँ आहेत. येथेच सराफ चेंबरही आहे. येथे रस्त्यावरच वाहने पार्क केलेली आढळतात. ही वाहने कधी सामान्य नागरिकांची, तर कधी ग्राहकांची, तर कधी अधिकाऱ्यांचीही असतात.
................