घरातूनच अवैध दारूविक्री, चक्क दिवाण, कपाटात लपविल्या देशी दारूच्या बाटल्या
By योगेश पांडे | Published: October 5, 2023 04:31 PM2023-10-05T16:31:41+5:302023-10-05T16:34:55+5:30
३८० हून अधिक बॉटल्स जप्त
नागपूर : घरातूनच अवैध देशीदारू विक्री करणाऱ्या एका रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्ण कुटुंबच यात गुंतले होते व घरातील दिवाण, फ्रिज तसेच दिवाणात दारूच्या बाटल्या लपविण्यात आल्या होत्या. सक्करदरा पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.
छायाबाई प्रकाश खानखुरे (६०, राणी भोसले नगर, शितलामाता मंदिराजवळ) ही महिला तिचा मुलगा आकाश (३३) व पवन (३३) यांच्या मदतीने दारूविक्रीचा अवैध व्यवसाय करत असल्याची महिती खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांच्या घरी धाड टाकली असता बाहेर तर काहीच आढळले नाही. मात्र पथकाने घरातील फ्रिज, दिवाण व कपाटाची तपाणी केली असता तेथे ९० मिलीच्या साडेतीनशे बाटल्या व १८० मिलीच्या ३२ बाटल्या आढळल्या. याशिवाय मोहफुलाची गावठी दारूदेखील आढळली.
पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सावरकर, संजय सिंह, चंद्रकांत साळवे, अनंत बुरडे, गोविंद देशमुख, दीपक रोहने, कुशल, राहुल कळंबे, रसिका घायवट यांच्या पथकाने ही कारवाई केली.