चिकना घाटात अवैध रेतीउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:43+5:302021-05-21T04:09:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातील कन्हान नदीवरील चिकना घाटाचा लिलाव करण्यात आला असून, या घाटात रात्रभर रेतीचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यातील कन्हान नदीवरील चिकना घाटाचा लिलाव करण्यात आला असून, या घाटात रात्रभर रेतीचा नियमबाह्य उपसा केला जात आहे. या रेतीच्या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे घाटाच्या परिसरातील रस्त्यांवर माेठमाेठे खड्डे तयार झाले असून, त्यावरून पायी चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे ही समस्या साेडविण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
कन्हान नदीवरील चिकना या रेतीघाटाचा काही दिवसांपूर्वी लिलाव करण्यात आला असून, कंत्राटदाराने घाटातील रेतीचा दाेन महिन्यांपासून उपसा व वाहतूक करायला सुरुवात केली आहे. या घाटात रात्रभर पाेकलॅँड मशीनद्वारे रेतीचा उपसा केला जात असून, त्यामुळे नदीच्या पात्रात माेठमाेठे व खाेल खड्डे तयार झाले आहे. या रेतीची ट्रक व टिप्परद्वारे याच भागातील रस्त्यांवरून ओव्हरलाेड वाहतूक केली जाते. या ओव्हरलाेड वाहनांमुळे रस्त्यांवर माेठमाेठे खड्डे तयार झाल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या वहिवाटीसाठी त्रास हाेत आहे.
रात्रभर रेतीचा उपसा करणे नियमबाह्य असूनही महसूल विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही. रेतीचाेरट्यांचे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने ते रेतीचाेरीकडे लक्ष देत नाही, असा आराेप काही जाणकार नागरिकांनी केला आहे. खरीप हंगाम ताेंडावर आला असून, शेतात जाणारे रस्ते चालण्यायाेग्य न राहिल्याने या भागातील शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे तक्रार करून या ओव्हरलाेड रेती वाहतुकीला आळा घालण्याची व शेतात जाणाऱ्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आराेप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. ही समस्या वेळीच न साेडविल्यास तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा राजेश फंदी, गजानन गेडेवार, जयपाल जोजाळकर, रुपेश सिरसाम यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे.
...
याबाबत आपल्याला तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे आपण रात्री त्या घाटाची पाहणी केली. मात्र, तिथे काहीही आढळून आले नाही. मी त्या ठिकाणी रिमार्क केले असून, आता आकस्मिक भेट देईन. रेती तस्कर व त्यांचे हस्तक तहसील कार्यालयात येत असल्याने काही अधिकाऱ्यांनाही ताकीद दिली आहे.
- प्रशांत सांगडे,
तहसीलदार, माैदा.