अवैध नाश्ता, गुटखा, खर्रा विक्री सुरूच : आरपीएफ, रेल्वे प्रशासन गाफील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:16 AM2020-05-24T00:16:12+5:302020-05-24T00:22:10+5:30
आऊटरवर श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या थांबल्यानंतर या गाड्यात पाणी, चहा, नाश्ता, भोजन, खर्रा आणि गुटख्याची विक्री होत असल्याची वार्ता ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. परंतु त्यानंतरही दुसऱ्या दिवशी ही विक्री सुरूच असल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आऊटरवर श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या थांबल्यानंतर या गाड्यात पाणी, चहा, नाश्ता, भोजन, खर्रा आणि गुटख्याची विक्री होत असल्याची वार्ता ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. परंतु त्यानंतरही दुसऱ्या दिवशी ही विक्री सुरूच असल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शुक्रवारी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांमध्ये नाश्ता, पाणी, खर्रा, गुटख्याची विक्री होत असल्याची वार्ता ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. परंतु त्यानंतरही येथील अवैध व्हेंडरची विक्री सुरूच होती. त्यामुळे हे व्हेंडर त्यांच्या ओळखीचे होते की काय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दुसऱ्या दिवशीही नाश्ता, चहा, गुटखा आणि खऱ्र्याची विक्री श्रमिक स्पेशल गाड्यांमध्ये झाल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
आरपीएफ करते तरी काय?
सध्या रेल्वेस्थानकावर मालगाड्या, विशेष पार्सल रेल्वेगाड्या, श्रमिक स्पेशल आणि राजधानी एक्स्प्रेसची वाहतूक सुरू आहे. या दरम्यान अवैध व्हेंडर खाद्यपदार्थ विक्री करीत असतील तर ही गंभीर बाब आहे. आरपीएफच्या लक्षात आणून दिल्यानंतरही या बाबी सुरू राहत असतील तर यापेक्षा गंभीर घटना दुसरी कोणती नसू शकते, अशी प्रक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. नव्यानेच आरपीएफच्या आयुक्तपदाचा कार्यभार आशुतोष पाण्ड्येय यांनी घेतला आहे. त्यानंतरही अशा घटना घडत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.