नागपुरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची लाखोंची अवैध उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:35 AM2018-09-03T10:35:23+5:302018-09-03T10:39:20+5:30
राज्यातून नागपुरात कोट्यवधी रुपयांच्या तंबाखूची अवैध वाहतूक होते. त्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून नागपुरातील गोरखधंदा विभागाच्या नाकावर टिच्चून होत असल्याची माहिती आहे.
मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभाग नागपुरात कारवाईच्या नावाखाली आठवड्यात एक वा दोन प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व खर्रा विक्रेत्यांवर धाडी टाकतात. राज्यात प्रतिबंधित तंबाखूची निर्मिती होत नसली तरीही लगतच्या राज्यातून नागपुरात कोट्यवधी रुपयांच्या तंबाखूची अवैध वाहतूक होते. त्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून नागपुरातील गोरखधंदा विभागाच्या नाकावर टिच्चून होत असल्याची माहिती आहे.
दररोज खऱ्याचा लाखोंचा व्यवसाय
नागपुरातील टोल नाके बंद झाल्यामुळे वाहतुकीवर प्रतिबंध नाही. शिवाय जीएसटींतर्गत ई-वे बिल नसलेल्यांवर दररोज कारवाई होत नाही. त्यामुळे बिनादिक्कत तंबाखू मोठ्या प्रमाणात नागपुरात येतो आणि विशिष्ट विक्रेत्यांच्या माध्यमातून पानटपऱ्यांवर वितरित होतो. नागपुरात तीन हजारांपेक्षा जास्त पानटपऱ्या सुरू असून त्यावर सुगंधित तंबाखूयुक्त खर्राच्या सर्रास विक्री होत असल्याचे लोकमतने प्रतिनिधीला पाहणीदरम्यान दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालय असो वा विभागीय कार्यालय सर्वच शासकीय कार्यालयांच्या परिसरात खर्रा सर्रास विकला जातो. इतवारी आणि गांधीबाग बाजारपेठेत रात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या पानटपऱ्यांवर सुगंधित तंबाखू टाकून पानांची विक्री करण्यात येते. या ठिकाणी सर्वच ब्रॅण्डचा तंबाखू ग्राहकांना सहज उपलब्ध मोठ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी
विभागाने पानटपऱ्यांऐवजी लाखो रुपयांच्या तंबाखूचा साठा करून विक्री करणाऱ्या मोठ्या विक्रेत्यांवर धाडी टाकाव्यात. तंबाखू वितरणाचे मोठे स्रोत बंद करावेत. त्यामुळे पानटपरी चालकांना तंबाखूच मिळणार नाही. कमी स्टाफ असण्याच्या कारणांवरून अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयाबाहेर निघतच नाही. शिवाय माहितीच्या आधारे बाहेर पडले तर पानटपºयांवर कारवाई करून मोकळे होतात. ही विभागाची नित्याचीच बाब असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पानटपरीचालकांना धाक नाही
विभागातर्फे नियमित कारवाया होत नसल्यामुळे प्रतिबंधित तंबाखूयुक्त खऱ्याची विक्री करणाऱ्या पानटपरीचालकांना अधिकाऱ्यांचा धाक राहिला नाही. कारवाईची माहिती होताच चालक टपरी बंद करतो. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हाती काहीही लागत नाही. केवळ दंडात्मक कारवाई नव्हे तर मुख्यत्वे युवकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या टपरीचालकांकडून हजारांनी दंड वसूल करण्याची गरज आहे, तरच तंबाखूच्या विक्रीवर काही प्रमाणात आळा बसेल. पावसाळी अधिवेशन काळात विभागाने टपरीला सील लावण्याच्या कठोर कारवाईनंतर पानटपरी चालकांमध्ये दहशत पसरली होती. अनेकांनी पानटपऱ्या बऱ्याच दिवसांपर्यंत उघडल्या नाहीत. कारवाईनंतर थोडासा दंड आकारण्यापलीकडे विभाग काहीही करीत नसल्यामुळे पानटपरीचालकांमध्ये विभागाचा धाक उरला नसल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले.
धाडीची कारवाई निरंतर प्रक्रिया
विभागाच्या वतीने प्रतिबंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर निरंतर कारवाई करण्यात येते. धाडीची कारवाई ही विभागाची निरंतर प्रक्रिया आहे. पानटपऱ्यांना सील लावण्याच्या कारवाईनंतर चालकांमध्ये धडकी भरली होती. नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांवर आता धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.
- शशिकांत केकरे, सहआयुक्त (अन्न)
अन्न व औषधी प्रशासन विभाग.