रुग्णवाहिकेतून दारूची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:42+5:302021-05-09T04:09:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : लाॅकडाऊनमुळे दारूची दुकाने व दारू विक्री बंद असल्याने माेहफुलांच्या दारूची मागणी वाढली आहे. या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : लाॅकडाऊनमुळे दारूची दुकाने व दारू विक्री बंद असल्याने माेहफुलांच्या दारूची मागणी वाढली आहे. या दारूची अवैध वाहतूक करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जाते. माेहफुलांच्या दारूची वाहतूक करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. वाडी पाेलिसांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वडधामना परिसरात केलेल्या कारवाईमध्ये दारूची अवैध वाहतूक करणारी रुग्णवाहिका पकडली. याप्रकरणी रुग्णवाहिका चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण १ लाख ५२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ७) मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.
सचिन दिलीप धावडे (२७, रा. माधवनगरी, एमआयडीसी, हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. वाडी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मध्यरात्री वडधामना परिसरात (क्र. एमएच-३१ सीक्यू-८४९९) क्रमांकाची रुग्णवाहिका येत असल्याचे दिसले. ती सायरन न वाजवता येत असल्याने पाेलिसांना संशय आला. त्यांनी रुग्णवाहिका थांबवून चालकाकडे विचारपूस सुरू केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे देली तसेच पाेलिसांना माेहफुलांचा वास आल्याने त्यांनी रुग्णवाहिकेची झडती घेतली. त्यांना वाहनात २५ लिटर माेहफुलांची दारू आढळून आली. त्यांनी चालकास अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले.
शिवाय, त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीची रुग्णवाहिका आणि २,५०० रुपयांची २५ लिटर माेहफुलांची दारू असा एकूण १ लाख ५२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. ती दारू भाेला प्रधान, रा. आयसी चाैक, हिंगणा राेड याच्या मालकीची असल्याचेही सचिन धावडे याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.