गुरांची अवैध वाहतूक, २३ जनावरांचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 12:38 PM2023-08-23T12:38:53+5:302023-08-23T12:40:06+5:30

सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Illegal transportation of cattle, 23 animals died of suffocation in the truck |  गुरांची अवैध वाहतूक, २३ जनावरांचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू

 गुरांची अवैध वाहतूक, २३ जनावरांचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू

googlenewsNext

रामटेक (नागपूर) : पाेलिसांच्या पथकाने जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री शिवारातील आरटीओ चेकपाेस्ट जवळ केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात त्यांना ४० पैकी २३ गुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या कारवाईमध्ये सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार हृदय नारायण यादव यांनी दिली.

जबलपूर-नागपूर महामार्गावरून नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या महामार्गावरील कांद्री शिवारातील चेकपाेस्टजवळ नाकाबंदी करून एमएपी-४१/११४२ क्रमांका ट्रक अडवला आणि झडती घेतली. पाेलिसांना त्या ट्रकमध्ये ४० जनावरे काेंबली असल्याचे तसेच त्यातील २३ गुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे आढळून आले.

ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच वाहनातील जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी पंचनामा करून मृत गुरांची विल्हेवाट लावली आणि उर्वरित १७ जनावरांना देवलापारच्या गाेविज्ञान केंद्रात पाठविण्याची व्यवस्था केली. या कारवाईत एकूण सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के, सहायक फाैजदार संजय पायक, हवालदार नितेश डोकरमारे, चेतन ठाकरे यांच्या पथकाने केली.

आरटीओ चेकपाेस्टचा उपयाेग काय?

जबलपूर-नागपूर महामार्गावरील कांद्री शिवारात आरटीओ चेकपाेस्ट आहे. या चेकपाेस्टवर प्रत्येक जड वाहनांची तपासणी केली जाते. हा ट्रक जनावरे घेऊन येत असताना चेकपाेस्टवर अडवून त्याची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात माेठ्या प्रमाणात गुरांना काेंबून त्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी पाेलिसांना दिली नाही. हा प्रकार नेहमीच घडत असल्याने या चेकपाेस्टवर उपयाेग काय, असा प्रश्न जाणकार व्यक्तींनी उपस्थित केला आहे.

Web Title: Illegal transportation of cattle, 23 animals died of suffocation in the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.