अवैध गाैण खनिजाची तस्करी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 12:57 PM2021-12-01T12:57:39+5:302021-12-01T13:18:49+5:30
सावनेर तालुक्यातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये गाैण खनिजाची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक करणारे १३ टिप्पर पकडले. यात रेतीचे सहा, गिट्टीचे सात आणि मुरुमाच्या एका टिप्परचा समावेश आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महसूल विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ३०) सावनेर तालुक्यातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये गाैण खनिजाची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक करणारे १३ टिप्पर पकडले. यात रेतीचे सहा, गिट्टीचे सात आणि मुरुमाच्या एका टिप्परचा समावेश आहे. या टिप्परमालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी दिली.
सावनेर तालुका रेतीच्या अवैध उपसा व वाहतूक तसेच गिट्टीच्या विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतुकीसाठी कुप्रसिद्ध आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील सावनेर-पांढुर्णा (मध्य प्रदेश) मार्गावर विविध ठिकाणी कारवाई करीत विना राॅयल्टी व ओव्हरलाेड रेतीवाहतुकीचे सहा, गिट्टी वाहतुकीचे सात आणि मुरुम वाहतुकीचा एक टिप्पर पकडला.
या पथकांना एमएच-४०/बीजी-९९६५, एमएच-४०/बीजे-९८६५, एमएच-३१/एफसी-४०००, एमएच-४०/डीटी-७४७४, एमएच-३८/एक्स-८३१३ आणि एमएच-४०/बीएल-७८७३ क्रमांकाच्या टिप्परमध्ये रेती, एमएच-४०/बीएल-२४६५, एमएच-४०/एसी-७४०६, एमएच-४०/सीडी-२१९७, एमएच-३१/एम-४५७२, एमएच-४०/एके-६४४१ व एमएच-४०/डीएल-२०८२ क्रमांकाच्या टिप्परमध्ये गिट्टी आणि एमएच-४०/एके-९९२७ क्रमांकाच्या टिप्परमध्ये मुरुम आढळून आला आहे. हे सर्व टिप्पर ताब्यात घेण्यात आले असून, ते तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आल्याचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी सांगितले.
३ लाख २ हजार ९०० रुपयांचा दंड
या टिप्पर मालकांवर सरासरी २३ हजार ३०० रुपयांप्रमाणे एकूण ३ लाख २ हजार ९०० रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे. रेती वाहतुकीच्या टिप्पर मालकांवर अधिक तर गिट्टी व मुरुम वाहतुकीच्या टिप्पर मालकांवर थाेडा कमी दंड आकारण्यात आला आहे. मालकांनी दंडाच्या रकमेचा भरणा केल्यानंतर त्यांचे टिप्पर गाैण खनिजांसह साेडून दिले जाणार आहेत. सातही टिप्परमध्ये आढळून आलेली रेती कन्हान नदीतील हाेती.
वाहतुकीवर कारवाई उपशाचे काय?
सावनेर तालुक्यातील कन्हान नदीच्या पात्रात माेठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात असून, मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील केळवद, खुर्सापार व अन्य शिवारात गिट्टीच्या खाणी असून, मुरुमाचे अवैध खाेदकाम केले जाते. याबाबत महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला संपूर्ण माहिती आहे. मात्र, ज्या ठिकाणी रेतीचा अवैध उपसा आणि मुरुमाचे खाेदकाम केले जाते, त्या ठिकाणी कुणीही धाडी टाकत नाही.