एसटी प्रवासासाठी आजारपण, अंत्यविधीचीच कारणे अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:06 AM2021-04-29T04:06:37+5:302021-04-29T04:06:37+5:30

नागपूर : सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एसटी प्रवासावरही मर्यादा आणल्या आहेत. महामंडळाच्या एसटीमधून आजारपण आणि अंत्यसंस्काराच्या कारणासाठीच अधिक ...

Illness for ST travel, more reasons for funeral | एसटी प्रवासासाठी आजारपण, अंत्यविधीचीच कारणे अधिक

एसटी प्रवासासाठी आजारपण, अंत्यविधीचीच कारणे अधिक

Next

नागपूर : सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एसटी प्रवासावरही मर्यादा आणल्या आहेत. महामंडळाच्या एसटीमधून आजारपण आणि अंत्यसंस्काराच्या कारणासाठीच अधिक प्रवास सुरू असल्याचे नागपूर विभागात चित्र आहे.

नागपूर विभागात एकूण आठ आगार आहेत. त्यातील गणेशपेठ, घाटरोड, इमामवाडा आणि वर्धमाननगर हे चार आगार शहरात असून सावनेर, उमरेड, काटोल आणि रामटेक हे चार आगार ग्रामीण भागात आहेत. यापैकी उमरेड आणि इमामवाडा या दोन आगारामधून सध्या एकही बस सुटत नाही. काटोल आणि गणेशपेठ या दोन आगारावरून सध्याच्या दिवसातही बसेस सोडल्या जात असल्या तरी सेवा मात्र मर्यादित आहे.

अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी महामंडळाची प्रवासीसेवा सध्या सुरू आहे. प्रवाशांकडून कारण समजून घेतल्यावरच प्रवास करू दिला जात असून, सरकारी कर्मचारी वगळता कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. यामुळे अनावश्यक प्रवास करणाऱ्यांच्या संख्येवर आपोआपच मर्यादा आली आहे.

नागपूर विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी दररोज तीन हजारावर व्यक्ती प्रवास करायचे. आता ही संख्या एकदम कमी होऊन सरासरी ६०० ते ७०० वर आली आहे. बसेसच्या फेऱ्याही कमी झाल्या असून, नागपूर विभागातून १० ते १२ बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. एका आगारातून जेमतेम एक ते दोन बसेस सुटत आहेत. मात्र गणेशपेठ मध्यवर्ती आगारातून रोज २५ ते ३० बसेसची ये-जा सुरू असून, जवळपास ८०० ते एक हजार व्यक्ती प्रवास करीत असल्याची माहिती आहे.

...

वर्धा, काटोल मार्गावर गर्दी अधिक

या दिवसात प्रवाशांची गर्दी फारच घटली आहे. असे असले तरीही वर्धा आणि काटोल या मार्गावर त्यातल्यात्यात अधिक प्रवासी असतात. वर्धा मार्गावर एमआयडीसी असल्याने काम आणि रोजगारासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. काटोल मार्गावरील ग्रामीण भागातून शहरात अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्यांसोबतच रोजगारासाठी जाणाऱ्यांची संख्या या मार्गावरही अधिक आहे.

...

कर्मचाऱ्यांसोबत वादाचे किरकोळ प्रसंग

एसटी कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांकडून वाद घालण्याचे प्रसंग किरकोळ घडत आहेत. प्रवासासाठी परवानगी नसणे, शिक्का मारून घेणे या कारणावरून वाद अधिक आहेत. मात्र प्रत्येक बसस्थानकावर आणि आगारात प्रवाशांसाठी यासंदर्भात फलकावर सूचना लावण्यात आल्याने हे वाद लवकरच शमतातही. प्रवासी पासवरून वाद कमी होत आहे. कर्मचारी त्यांच्या शासकीय कार्यालयाचे पत्र किंवा ओळखपत्र दाखवीत असेल तर प्रवासाला परवानगी दिली जात असल्याचे बेलसरे यांनी सांगितले.

...

Web Title: Illness for ST travel, more reasons for funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.