मैं हिट हू, और फिट भी! नागपूरची गोल्डन लेडी हेलन जोजफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:18 AM2018-03-08T10:18:34+5:302018-03-08T10:18:47+5:30
‘मेरी उम्रपर मत जाओ, मैं हिट भी हू और फिट भी.’ हेलन जोजफ असे त्यांचे नाव.
मंगेश व्यवहारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: हरणाची चपळता, वाघिणीचे बळ, मर्दानीसारखी शरीरयष्टी. आॅर्डनन्स फॅक्टरीच्या मैदानावर पहाटे तिला वाऱ्यासारखी धावताना बघून प्रत्येकालाच आश्चर्य वाटते. तिला जेव्हा वय विचारतात, तेव्हा सर्वच अवाक् होतात. होय, ही विशेषणे जिच्यासाठी आहेत त्या ६३ वर्षीय महिलेचा उत्साह, जोश तरुणींनाही लाजवेल असाच आहे. त्यामुळे आॅर्डनन्स फॅक्टरीत त्या गोल्डन लेडी म्हणून प्रसिद्ध आहेत.
आपल्या खेळाडूवृत्तीचा अभिमान असल्याचे सांगत त्या म्हणतात, ‘मेरी उम्रपर मत जाओ, मैं हिट भी हू और फिट भी.’ हेलन जोजफ असे त्यांचे नाव. आजकाल चाळीशीनंतरच महिला नाना प्रकारच्या आजाराला बळी पडतात. त्यामुळे त्यांचे शारीरिकच नव्हे तर मानसिक खच्चीकरण होते. याला हेलन जोजफ अपवाद आहेत. ६३ वर्षाच्या हेलन यांना कुठलाच आजार नाही. खडगाव रोड, वाडी येथे राहणाऱ्या जोजफ यांना दोन मुले, सुना व नातवंडं आहेत. आॅक्टोबरमध्ये पतीचा मृत्यू झाल्यानंतरही बेंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या मास्टर्स अॅथ्लेटिक्स स्पर्धेत त्या सहभागी झाल्या. शालेय जीवनापासूनच त्यांना खेळाची आवड होती.
आई आणि वडीलसुद्धा उत्कृष्ट खेळाडू होते. पती फुटबॉल खेळाडू होते. १९६८ पासून त्या सातत्याने मैदानाशी जुळल्या आहेत. त्यांना आॅर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी होती. आॅर्डनन्स फॅक्टरीच्या होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत त्यांनी कधीच सुवर्ण पदक सोडले नाही.
त्यामुळे त्यांना गोल्डन लेडीचा मान मिळाला. निवृत्तीनंतरही त्यांनी हे बिरुद कायम ठेवले आहे. आजही पहाटे ५.३० वाजता त्या मैदानावर असतात. नियमित सराव करतात. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलींना त्या प्रशिक्षण देतात. जपान, चायना, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर येथे झालेल्या मास्टर्स अॅथ्लेटिक्स एशियन चॅम्पियनशिपमध्ये हायजम्प, ट्रिपल जम्प, १०० मिटर रनिंग, गोळाफेकमध्ये सुवर्णपदके पटकाविली आहेत. स्पेन येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड मीट’साठी त्यांची निवड झाली आहे.