‘आयएमए’ काळा दिवस : नागपुरात खासगी हॉस्पिटलच्या बंदचा बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 08:20 PM2018-01-02T20:20:36+5:302018-01-02T20:23:28+5:30
‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या(एनएमसी)विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने(आयएमए)मंगळवारी काळा दिवस पाळत खासगी इस्पितळांनी बाह्यरुग्ण विभाग(ओपीडी)बंद ठेवला. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली. अनेक रुग्णांना वेळेवर मेयो, मेडिकल गाठावे लागले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : ‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या(एनएमसी)विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने(आयएमए)मंगळवारी काळा दिवस पाळत खासगी इस्पितळांनी बाह्यरुग्ण विभाग(ओपीडी)बंद ठेवला. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली. अनेक रुग्णांना वेळेवर मेयो, मेडिकल गाठावे लागले. विशेष म्हणजे, संपूर्ण देशातून काळा दिनाच्या बातम्या पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आल्याने संसदेत सादर करण्यात आलेले ‘एनएमसी’ विधेयक चर्चेसाठी संसदीय समितीकडे गेले. हा ‘आयएमए’चा पहिला विजय असल्याचे बोलले जात आहे.
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ हे सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे, असे असताना केंद्र सरकार हे विधेयक लादण्याच्या तयारीत होते. हे विधेयक जर आले तर वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघणार होते. या विधेयकाला घेऊन गेल्या वर्षभरापासून ‘आयएमए’ सरकारचे लक्ष वेधत आहे. २ आॅक्टोबर २०१७ रोजी देशभरातील डॉक्टरांनी या विधेयकाच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन केले. परंतु त्यानंतरही हे विधेयक मंगळवारी संसदेत येणार होते. याला विरोध म्हणून देशभरातील ‘आयएमए’ने मंगळवारचा दिवस काळा दिवस म्हणून पाळला. नागपुरातील सुमारे ६५० इस्पितळांनी यात सहभागी होत ओपीडी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवली. विशेष म्हणजे, या आंदोलनात काही रेडिओलॉजी व पॅथालॉजीचे डॉक्टरही सहभागी झाल्याने खासगी रुग्णसेवेला चांगलाच फटका बसला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
‘आयएमए’ नागपूर शाखेने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना देऊन त्यांनी याविषयी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे, नागपूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, सचिव डॉ. प्रशांत राठी, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. प्रकाश देव, डॉ. संजय देशपांडे, डॉ. कृष्णा पराते, डॉ. आशिष दिसावल आदी उपस्थित होते.
मेयो, मेडिकलमध्ये डॉक्टरांनी बांधल्या काळ्या फिती
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने ‘आयएमए’च्या काळा दिवसाला पाठिंबा दिला. मंगळवारी काळ्या फिती बांधून रुग्णसेवा दिली. ओपीडीपासून ते आकस्मिक विभागात सेवा देणारे निवासी डॉक्टर काळ्या फिती बांधून होते.
‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ. देशपांडे म्हणाले,‘आयएमए’ने मंगळवारी काळा दिवस पाळत ओपीडी बंद ठेवण्याच्या आवाहनाला बहुसंख्य इस्पितळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ओपीडी बंद होती. अनेक इस्पितळांनी ओपीडी बंदचे फलक लावले होते. रुग्णाचे हित लक्षता घेऊन केवळ आकस्मिक सेवा सुरू होती.
हा पहिला विजय
डॉ. देव म्हणाले,‘नॅशनल मेडिकल कमिशन’आज संसदेत पास होणार होते. परंतु देशभरात ‘आयएमए’ने काळा दिवस पाळून त्यासंदर्भात प्रकाशित झालेले वृत्त पंतप्रधान कार्यालयालाा पाठविल्याने त्याचा प्रभाव दिसून आला. तूर्तास हे विधेयक संसदीय समितीकडे पाठविले आहे. यामुळे यात काही चांगल्या दुरुस्त्या किंवा ‘इंडियन मेडिकल कौन्सिल’मध्येच आवश्यक दुरुस्त्या करून तेच विधेयक कायम ठेवण्याची शक्यता आहे. हा ‘आयएमए’चा पहिला विजय आहे.