डॉक्टरांवरील हल्ल्याचा आयएमएकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 12:25 AM2021-06-19T00:25:30+5:302021-06-19T00:25:54+5:30
IMA protests attack on doctors डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करावा, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्यावतीने शुक्रवारी ठिकठिकाणी निदर्शने करीत आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देत असताना त्यांच्यावर व रुग्णालयांवर हल्ले सुरूच आहेत. वाढत्या हल्ल्यांमुळे रुग्णांना सेवा देताना निर्भयपणाचे वातावरण राहिले नाही. एका दबावाखाली रुग्णसेवा द्यावी लागत आहे. यामुळे डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करावा, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्यावतीने शुक्रवारी ठिकठिकाणी निदर्शने करीत आंदोलन केले. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत खासगी हॉस्पिटल बंद ठेवण्यात आल्याने याचा फटका रुग्णसेवेलाही बसला.
‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, सचिव डॉ. सचिन गाठे यांच्या मुख्य उपस्थितीत आयएमए सभागृहासमोर नारे निदर्शने करण्यात आली. त्यानंतर संविधान चौक, झिरो माईल्स व झाशी राणी चौक सीताबर्डी येथेही हातात फलक घेऊन निदर्शने करण्यात आली. या सोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) , राज्य कामगार विमा रुग्णालय, शालिनीताई मेघे रुग्णालयाच्या समोर तेथील निवासी डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर व आयएमएच्या सदस्यांनी निदर्शने केली. दुपारी डॉ. देवतळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी देवेंद्र ठाकरे यांना मागण्यांचे निवेदनही सादर केले. यावेळी डॉ. देवतळे. डॉ. मिलिंद नाईक, डॉ. वर्षा ढवळे, डॉ. बी.के.शर्मा, डॉ. विंकी रुघवानी, डॉ.मुकुंद गणेरीवाल, डॉ. शहनाज चिमठाणवाला, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. सत्कार पवार, डॉ. मनिषा राठी, डॉ. संदीप मोगरे, डॉ. अर्चना कोठारी व डॉ. राजेश सावरबांधे उपस्थित होते.
-गृहमंत्रालयाच्या आक्षेपामुळे कायदा थांबलेला
डॉ. देवतळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याचा मसुदा संसदेमध्ये तयार आहे. केवळ गृहमंत्रालयाच्या काही आक्षेपांमुळे तो कायदा पारित होण्यापासून थांबलेला आहे. तो त्वरित लागू व्हावा व आरोग्य व्यवस्थेवरील हिंसाचार हा भारतीय दंड संहितेच्या कक्षेत यावा, या व इतर मागणीसाठी आम्ही हे आंदोलन उभारले आहे.
-या आहेत मागण्या
:: डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करण्यात यावा.
:: सर्व वैद्यकीय आस्थापनाना संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे
:: रुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे
:: हल्लेखोर व्यक्तीवरील खटले जलद न्यायालयात चालविण्यात यावे