तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी आयएमएने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:52+5:302021-05-21T04:07:52+5:30

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात असून यात बालकांना अधिक प्रमाणात लागण होण्याची शक्यता आरोग्य संघटनेने ...

The IMA should take the lead in planning the third wave | तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी आयएमएने पुढाकार घ्यावा

तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी आयएमएने पुढाकार घ्यावा

Next

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात असून यात बालकांना अधिक प्रमाणात लागण होण्याची शक्यता आरोग्य संघटनेने वर्तविली आहे. असे झाले तर तो काळ सर्वाधिक आव्हानात्मक असेल. कारण लहान मुलांना लागण झाली तर त्यांच्या सोबत विलगीकरणात राहणाऱ्या पालकांनाही बाधा होईल. याचा विचार करून पुढील नियोजन करावे लागेल. इंडियन मेडिकल असोसिएशनने या कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी येथे केले.

महानगरपालिका आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाइन’ परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिचर्चेत सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य सभापती संजय महाजन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, आय.एम.ए.चे सदस्य डॉ. मंजुषा गिरी, डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. विजय धोटे, डॉ. संदीप अंजनकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. विनोद गांधी, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. राऊत आदी सहभागी झाले होते.

आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत तरुण पिढीला लागण झाली. तिसऱ्या लाटेत लसीकरण न झालेल्या बालकांना बाधा होण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी नियोजन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाच्या व्यवस्थेचीही तयारी ठेवावी लागेल, असे ते म्हणाले. डॉ. मंजुषा गिरी म्हणाल्या, लहान मुलांचा वयोगट १ ते ५, वयोगट ६ ते १० आणि १० ते १८ अशा दृष्टीने वर्गीकरण करून त्यादृष्टीने नियोजन करावे लागेल. डॉ. प्रशांत निखाडे यांनी कोविडनंतर तयार होणाऱ्या काळ्या बुरशीवर प्रकाश टाकला. मास्क हा सर्वांत प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उपस्थित तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. महापौर तिवारी म्हणाले, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागेल. यासाठी ‘आयएमए’ने पुढाकार घ्यावा. नागपूर महानगरपालिका पूर्णपणे सहकार्य करून त्याचे व्यवस्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी दिला.

Web Title: The IMA should take the lead in planning the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.