‘आयएमए’ची माघार, निवासी डॉक्टर ठाम

By admin | Published: March 25, 2017 02:51 AM2017-03-25T02:51:15+5:302017-03-25T02:51:15+5:30

निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्याला घेऊन गेल्या दोन दिवसांपासून संपावर गेलेल्या ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’

'IMA withdrawal, resident doctor' | ‘आयएमए’ची माघार, निवासी डॉक्टर ठाम

‘आयएमए’ची माघार, निवासी डॉक्टर ठाम

Next

मेयो, मेडिकलमध्ये रुग्णांचा जीव टांगणीला : कामावर रुजू न होणाऱ्या डॉक्टरांची रद्द होणार नोंदणी
नागपूर : निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्याला घेऊन गेल्या दोन दिवसांपासून संपावर गेलेल्या ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) नागपूर शाखेने शुक्रवारी सायंकाळी माघार घेतली, मात्र मेयो मेडिकलचे निवासी डॉक्टर रात्री उशिरापर्यंत आपल्या मागण्यांना घेऊन ठाम होते. सूत्रानुसार, शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत कामावर रुजू न होणाऱ्या निवासी डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याच्या सूचना अधिष्ठात्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, पाचव्या दिवशी, शुक्रवारी मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर रजेवर असल्याने रुग्णांचे हाल झाले. सहा निवासी डॉक्टरांचे काम एक किंवा दोन वरिष्ठ डॉक्टरांवर आल्याने अतिगंभीर रुग्णांनाच भरती करुन घेतले जात होते. मेयोमध्ये केवळ ३८ रुग्णांना भरती केले तर मेडिकलमध्ये हा आकडा शंभरच्यावर गेला नव्हता. धुळे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद व पुणे येथील रुग्णालयात झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध व सुरक्षेचा मुद्दा रेटून धरत निवासी डॉक्टरांनी सोमवार २० मार्चपासून वैयक्तिक स्वरूपात कामबंद आंदोलन सुरू केले. परंतु याला १२ तास होत नाही तोच मेयोच्या ११० तर मेडिकलच्या ३३० निवासी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याला ‘आयएमए’ने विरोध दर्शवित निलंबनाची कारवाई मागे घेण्यासह डॉक्टरांच्या सुरक्षा संदर्भातील विविध मागण्या सामोर करीत बुधवारी दुपारपासून संपात उडी घेतली. यात पॅथालॉजी, रेडिओलॉजी व इंडियन दंत असोसिएशनही सहभागी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानीची आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती. खासगी रुग्णालयातील ओपीडी बंद पडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर ऐनवेळी धावाधाव करण्याची वेळ आली. अनेकांनी मेयो, मेडिकल गाठले, परंतु डॉक्टरांच्या तोकड्या संख्येमुळे रुग्णांना तत्काळ उपचार मिळणे कठीण झाले होते. संपावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी राज्य आयएमएचे वरिष्ठ पदाधिकारी व ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. यात निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पाच दिवसांत ७०० व १५ दिवसांत एकूण ११०० बंदुकधारी सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसह इतरही महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यामुळे सायंकाळी ‘आयएमए’ने तत्काळ संप मागे घेतला. नागपूर ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे व सचिव डॉ. अर्चना कोठारी यांनी आपल्या सदस्यांना याची माहिती देत बाह्यरुग्ण विभागात सेवा देण्याच्या सूचना केल्या. परंतु रात्री उशिरापर्यंत मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर कामावर परतले नव्हते. रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. दरम्यान, पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी यांनी मेडिकलच्या आकस्मिक विभागाची पाहणी करीत शनिवारपासून बंदुकधारी पोलीस तैनात करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)

मेयोचे सहा निवासी डॉक्टर झाले रुजू
मेयोचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीमुळे रात्री ७ वाजेपर्यंत सहा निवासी डॉक्टर आपल्या कामावर रुजू झाले. मेयोच्या बाह्यरुग्ण विभागात १५१८ रुग्णांनी उपचार घेतला तर ३८ रुग्णांना भरती करून घेण्यात आले.
१२ गुंतागुंतीच्या व तीन किरकोळ शस्त्रक्रिया झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मेडिकलमध्ये भरती रुग्णांची संख्या रोडावली
निवासी डॉक्टरांचा भार वरिष्ठ डॉक्टरांवर आल्याने मेडिकलमध्ये केवळ अतिगंभीर रुग्णांनाच भरती केले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी मेडिकलमध्ये ११४० रुग्ण भरती होते. २२ मार्चला ही रुग्णसंख्या कमी होऊन ८९०, २३ मार्चला ८३० तर २४ मार्चला ७५२ रुग्ण विविध वॉर्डात उपचार घेत होते.
वैद्यकीय शिक्षकांचा मूक मोर्चा निघालाच नाही
महाराष्ट्र राज्य मेडिकल टीचर्स असोसिएशनने निवासी डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध व सुरक्षा व्यवस्था चोख करण्यासाठी शुक्रवारी काळ्या फिती लावून सेवा देण्याची व सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या परिसरात मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. तसे पत्र अधिष्ठात्यांनाही दिले होते. परंतु आज मूक मोर्चा निघालाच नाही. केवळ काळ्या फिती बांधून आंदोलन गुंडाळण्यात आले. यामुळे मेयो, मेडिकलमध्ये या घटनेला घेऊन उलटसुलट चर्चेला पेव फुटले होते.

 

Web Title: 'IMA withdrawal, resident doctor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.