कल्पनाशक्तीतून गाठा उद्योगक्षेत्रातील शिखर

By admin | Published: February 2, 2016 02:42 AM2016-02-02T02:42:29+5:302016-02-02T02:42:29+5:30

‘करिअर’संदर्भात तरुणाईचे विचार प्रचंड बदलत असून उद्योजकतेची मानसिकता वाढत आहे. उद्योजक होण्यासाठी प्रचंड भांडवल हवे हा सर्वसाधारण समज आहे.

From the imagination to the peak industry | कल्पनाशक्तीतून गाठा उद्योगक्षेत्रातील शिखर

कल्पनाशक्तीतून गाठा उद्योगक्षेत्रातील शिखर

Next

नितीन गडकरी : ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’मध्ये तरुणांना केले मार्गदर्शन
नागपूर : ‘करिअर’संदर्भात तरुणाईचे विचार प्रचंड बदलत असून उद्योजकतेची मानसिकता वाढत आहे. उद्योजक होण्यासाठी प्रचंड भांडवल हवे हा सर्वसाधारण समज आहे. परंतु त्याहून अधिक संबंधित उद्योगाचा अभ्यास आणि आत्मविश्वास यांची आवश्यकता आहे. तरुणांनी कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नवनवीन विचार प्रत्यक्षात उतरवून उद्योगक्षेत्रातील शिखर गाठले पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘फॉर्च्युन फाऊंडेशन’च्या वतीने मानकापूर क्रीडा संकुल येथे आयोजित ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’च्या अखेरच्या दिवशी तरुणांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी मंचावर राज्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘फॉर्च्युन फाऊंडेशन’चे मुख्य संयोजक आ. अनिल सोले, आ.सुधाकर कोहळे, सहसंयोजिका राणी द्विवेदी प्रामुख्याने उपस्थित होते. उद्योग स्थापन करताना टाकावू वस्तूंपासून सर्वोत्तम गोष्ट कशी तयार करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता, रोजगार उपलब्ध करून देणारे बनावे. नवीन संकल्पनेतूनच यशाचा मार्ग मिळतो, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. यावेळी गडकरी यांनी तरुणांना विविध उद्योगांची उदाहरणे दिली. यात औष्णिक विद्युत केंद्राच्या ‘अ‍ॅश’मधून विटानिर्मिती, पाण्यात उतरणारे विमान इत्यादींबाबत माहिती दिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर तरुणांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)


‘स्टार्टअप’च्या माध्यमातून देशाचा विकास
गेल्या काही काळापासून ‘स्टार्टअप’ या व्याख्येला महत्त्व प्राप्त झाले आहे. देशभरामध्ये सुरू झालेल्या ‘स्टार्टअप’ मोहिमेला तरुणांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून तरुणांना स्वत:ची ओळख निर्माण करता येऊ शकते. शिवाय देशदेखील विकासाकडे झेप घेईल, असे प्रतिपादन उद्योगपती संकेत खेमका यांनी व्यक्त केले. ‘स्टार्ट अप इंडिया’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.यावेळी नरेंद्र मोदी विचार मोर्चाचे परदेश अध्यक्ष उज्ज्वल ठेंगडी उपस्थित होते. चित्रपट क्षेत्रातील विविध संधींवर यावेळी ठेंगडी यांनी प्रकाश टाकला. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पारंपरिक रोजगाराऐवजी नवीन काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्यांना या क्षेत्रात प्रचंड वाव असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जेडी कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगचे प्रा. सुभाष चौधरी यांची उपस्थिती होती.

जल व्यवस्थापनात तरुणांना संधी
जल व्यवस्थापन क्षेत्राला मागणी होत आहे. या क्षेत्रात अगदी घरगुती नळजोडणीपासून ते औद्योगिक क्षेत्रातील आवश्यकतांचा समावेश होतो. या क्षेत्रात विविध पातळींवर रोजगारांच्या संधी उपलब्ध आहे, असे मत ‘नीरी’चे वरिष्ठ संशोधक सी.के.खडसे यांनी व्यक्त केले. ‘जल व्यवस्थापनातील संधी’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी ‘ओसीडब्लू’ आणि ‘विदर्भ इन्फ्रा’चे सत्यजित राऊत यांची उपस्थिती होती.

‘आयटी’त भारताचा दबदबा
जगभरातील नामवंत ‘आयटी’ कंपन्यांमध्ये भारतीय तरुणांचा दबदबा आहे. जगभरात या क्षेत्रामध्ये भारतीयांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आपल्या देशात जास्तीतजास्त ‘आयटी’ उद्योग उभे राहावे यासाठी तरुणांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रशांत उगेमुगे यांनी केले. ‘इलेक्ट्रॉनिक उद्योगातून रोजगार संधी’ या विषयावर आयोजित परिसंवादादरम्यान ते बोलत होते. प्रसंगी कुणाल पडोळे, प्रवीण द्वारंवार, समीर बेंदरे यांची उपस्थिती होती. ‘आयटी’चा उपयोग प्रत्येक क्षेत्रात होत आहे. त्यामुळे येथे प्रचंड प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध आहेत. आत्मविश्वासाने तरुणांनी या क्षेत्रात उद्योजकतेकडे वळावे, असे उगेमुगे म्हणाले.

‘नागपूर मेट्रो’मुळे मिळणार हजारोंना रोजगार
‘मेट्रो’ प्रकल्पामुळे नागपूरला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती होणार आहे. येत्या दोन वर्षांत हजारो तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे, असे मत ‘मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले. यावेळी ‘डीजीएम’ शिरीष आपटे उपस्थित होते. ‘मेट्रो’ प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन तरुणांनी स्वत:ला तयार करण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी सखोल अभ्यास करावा, असे आवाहन दीक्षित यांनी केले.

Web Title: From the imagination to the peak industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.