काळजी घ्या! पारा ४५ अंशापार; विदर्भात २ मेपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 12:54 PM2022-04-29T12:54:38+5:302022-04-29T12:57:59+5:30
पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी हवामान खात्याने विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी केला असून शनिवारपासून ते २ मे पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
नागपूर : बुधवारप्रमाणे गुरुवारीदेखील विदर्भातील बहुतांश शहरांमधील वातावरण तापलेलेच होते. वर्ध्यात परत एकदा पारा ४५ च्या पार गेला. तर अकोला, चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथेदेखील ४५ अंश सेल्सिअसहून अधिक तापमान नोंदविण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर येथे सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन मेपर्यंत विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला असून गुरुवारीदेखील ‘एप्रिल हिट’चे चटके बसले. तीन शहरांमध्ये ४४ अंश सेल्सिअसहून अधिक तापमान होते. यात नागपूर (४४.३), यवतमाळ (४४.७), अमरावती (४४.४) यांचा समावेश होता. मागील २४ तासांत अकोला, बुलडाणा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ येथे ०.१ ते ०.६ अंश सेल्सिअस तापमानाची वाढ दिसून आली.
पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी हवामान खात्याने विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी केला असून शनिवारपासून ते २ मे पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. प्रामुख्याने अकोला, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान आणखी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
रणरणत्या उन्हात जाता, ही घ्या काळजी
१)उपाशी पोटी उन्हात जाऊ नका. खूप पाणी प्या. छत्री, टोपी व गॉगल्सचा उपयोग करा. डोक्याला बांधूनच निघा. उन्हातून एकदम ‘एसी’ किंवा ‘कूलर’च्या हवेत जाणे टाळा.
२) खूप जास्त घाम निघत असेल, ताप आला असेल आणि थकवा वाटत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
३) उष्माघात झाल्यास हवेशीर खोलीत रहा. पंखे, कूलर लावा. शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करा. गार पाण्याने अंघोळ करा. कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा.
४) कोल्डड्रिंक ऐवजी नारळपाणी, लिंबू सरबत, ताक प्या. दूषित अन्न व पाण्यामुळे गॅस्ट्रो होतो. यामुळे उघड्यावरील खाद्य पदार्थ टाळा. उलटी, मळमळणे, पोट दुखणे, अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जिल्हानिहाय कमाल तापमान
जिल्हा : तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अकोला : ४५.४
अमरावती : ४४.४
बुलडाणा : ४२.३
ब्रह्मपुरी : ४५.२
चंद्रपूर : ४५.८
गडचिरोली : ४२.८
गोंदिया : ४३.५
नागपूर : ४४.३
वर्धा : ४५.१
वाशीम : ४३.०
यवतमाळ : ४४.७