शेतकऱ्याच्या मेसेजची पालकमंत्र्यांकडून तत्काळ दखल

By admin | Published: October 1, 2015 03:22 AM2015-10-01T03:22:00+5:302015-10-01T03:22:00+5:30

मंगळवार रात्री सुमारे ११ ची वेळ. मौद्यातील एक शेतकऱ्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मोबाईलवर मेसेज केला. साहेब... करपा रोगाने धान उत्पादक शेतकरी त्रस्त आहे.

Immediate intervention of the Guardian Minister of the farmer's message | शेतकऱ्याच्या मेसेजची पालकमंत्र्यांकडून तत्काळ दखल

शेतकऱ्याच्या मेसेजची पालकमंत्र्यांकडून तत्काळ दखल

Next

जिल्हा प्रशासनाने घेतला आढावा :
करपा, कडाकरपा रोगावर सुचविले उपाय

नागपूर : मंगळवार रात्री सुमारे ११ ची वेळ. मौद्यातील एक शेतकऱ्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मोबाईलवर मेसेज केला. साहेब... करपा रोगाने धान उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. याकडे मुख्यमंत्री साहेबांचे लक्ष वेधा. व्यस्त असलेल्या संवेदनशील पालकमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या या मेसेजची तत्काळ दखल घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून याचा आढावा घेण्याचे व शेतकऱ्यांना उपाय सुचविण्याचे निर्देश दिले. जिल्हा प्रशासनानेही गतिमानता दाखविली. बुधवारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली व करपा, कडाकरपा रोगावर काय उपाय योजता येतील, याची माहिती शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध केली.
गोपाल चौक, मौदा येथील शेतकरी राहुल हटवार यांनी मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास पालकमंत्री बावनकुळे यांना मेसेज केला. या मेसेजमध्ये त्यांनी नमूद केले की, मौदा तालुक्यातील धान पिकावर करपा, कडाकरपा या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधावे. यावर उपाय योजण्याची त्यांना विनंती करावी व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून वाचवावे. शेतकऱ्यांच्या या लढ्यात आपणही सहभागी व्हावी, अशी कळकळीची विनंती संबंधित शेतकऱ्याने मेसेजमध्ये केली होती. हा मेसेज वाचून पालकमंत्री बावनकुळे चिंतातूर झाले. मात्र, दुसऱ्याच क्षणाला वेळ न घालवता रात्रीच त्यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना फोन केला व धान पिकावर आलेल्या रोगाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना उपाय सुचविण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनीही गतिमान प्रशासनाची पावती देत बुधवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील मौदा, पारशिवनी, रामटेक, कामठी, भिवापूर, उमरेड, कुही या तालुक्यातील धान उत्पादक भागात धानावर करपा आणि कडाकरपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव कृषी विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आल्याची माहिती समोर आली. याची दखल घेत पुढील काही दिवस धान पिकावर लक्ष ठेवून राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुर्वे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीनंतर करपा, कडाकरपा रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध केली. (प्रतिनिधी)

Web Title: Immediate intervention of the Guardian Minister of the farmer's message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.