नागपूर विमानतळावर पार्किंगचे अवाढव्य शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:39 PM2019-06-05T23:39:57+5:302019-06-05T23:40:51+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना टर्मिनल परिसरात सोडण्यासाठी आणि पिकअप करण्यासाठी वाहनचालकाकडून पहिले पाच मिनिटे कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसले तरीही इतर सेवांसाठी शुल्क मोजावे लागते. पूर्वीच पार्किंगच्या असलेल्या अवाढव्य शुल्कात १ एप्रिलपासून १० टक्के वाढ केल्यामुळे वाहनचालकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक त्रस्त असून त्यांची ओरड सुरू आहे. वेगवेगळे वाहन आणि वेळेनुसार पार्किंगच्या शुल्कात १० ते २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. देशात नागपूर विमानतळावर पार्किंग शुल्क सर्वाधिक असल्याचे वाहनचालकांचे मत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना टर्मिनल परिसरात सोडण्यासाठी आणि पिकअप करण्यासाठी वाहनचालकाकडून पहिले पाच मिनिटे कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसले तरीही इतर सेवांसाठी शुल्क मोजावे लागते. पूर्वीच पार्किंगच्या असलेल्या अवाढव्य शुल्कात १ एप्रिलपासून १० टक्के वाढ केल्यामुळे वाहनचालकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक त्रस्त असून त्यांची ओरड सुरू आहे. वेगवेगळे वाहन आणि वेळेनुसार पार्किंगच्या शुल्कात १० ते २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. देशात नागपूर विमानतळावर पार्किंग शुल्क सर्वाधिक असल्याचे वाहनचालकांचे मत आहे.
सुरक्षेसाठी पार्किंगचे विभाजन, वेळेनुसार शुल्क
विमानतळावर येणाऱ्या वाहनांची वाढती संख्या आणि सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता विमानतळ प्रशासनाने पार्किंग यंत्रणेत बदल केले आहेत. विमानतळाच्या टर्मिनल परिसरात होणारी वाहनांची गर्दी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पार्किंग झोनला चार भागात विभाजित केले आहे. यामध्ये फ्री ड्रॉप एरिया, प्रीमियम पिकअप अॅण्ड ड्रॉप एरिया, जनरल पिकअप अॅण्ड ड्रॉप एरिया आणि जनरल पार्किंग एरियाचा समावेश आहे. टर्मिनल इमारतीसमोरील फ्री ड्रॉप एरियात वाहन पाच मिनिटांपर्यंत उभे राहू शकतात. पण पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास शुल्क आकारण्यात येते. पूर्वी दुचाकीसाठी ५० रुपये, कॅबसाठी पाच मिनिटांचे १०० रुपये आणि तीनचाकी वाहनांसाठी ७० रुपये आकारण्यात येत होते. आता त्यात वाढ करून दुचाकीसाठी ६० रुपये, कॅबसाठी १२० रुपये आणि तीनचाकीसाठी ९० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
याशिवाय टर्मिनल इमारतीच्या थोड्याच अंतरावर प्रीमियम पिकअप अॅण्ड ड्रॉप एरियामध्ये पूर्वी १५ मिनिटांसाठी कार आणि कॅबला ३०० रुपये पार्किंग शुल्क लागायचे. त्यात वाढ होऊन आता ३६० रुपये आणि एलसीव्ही मिनीबसचे पार्किंग शुल्क एक हजारावरून १२०० रुपयांपर्यंत वाढविले आहे. त्यानंतरच्या प्रत्येक १५ मिनिटांसाठी तेवढेच शुल्क आकारण्यात येत आहे.
मासिक पासचे शुल्क वाढले
कंत्राटदारातर्फे झोन-३ करिता मासिक पास जारी करण्यात येते. पासच्या शुल्कात २५०० रुपयांवरून ३ हजारांपर्यंत वाढ झाली आहे. एलसीव्ही, मिनी बससाठी पूर्वी १३ हजार आता १५ हजार ६०० रुपये, दुचाकीसाठी पूर्वी एक हजार आता १२०० रुपये आणि तीनचाकी वाहनांसाठी १६०० रुपयांवरून १९२० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.