मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावातच करा : आयुक्तांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 11:27 PM2019-09-04T23:27:21+5:302019-09-04T23:28:13+5:30
घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा, तलावात विसर्जन करू नये याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा, तलावात विसर्जन करू नये याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. गणेश विसर्जन व्यवस्थेसंदर्भातील पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी महापालिका मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.
यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, मुख्य अभियंता मनोज तालेवार, झोन सहायक आयुक्त गणेश राठोड, प्रकाश वराडे, हरीश राऊत, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.सरिता कामदार, सहायक प्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अविनाश बाराहाते, राजेश रहाटे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आदी उपस्थित होते.
प्रारंभी आयुक्तांनी विसर्जनस्थळावर प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरात एकूण ३०० कृत्रिम तलाव ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. फुटाळा तलावावर आवश्यक कृत्रिम तलावांची व्यवस्था करा, गणेश विसर्जन दुसऱ्या दिवसापासूनच सुरू होते. त्यामुळे कृत्रिम तलावाची दररोजची संख्या किती याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विसर्जनस्थळी आवश्यक ते सूचना फलक , निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात यावे, कृत्रिम तलाव स्वच्छ करताना रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत करण्यात यावा. यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
फुटाळ्यावरील कृत्रिम टाकीत ५०० च्या जवळपास मूर्तीचे विसर्जन
गणेशाची स्थापना झाल्यानंतर दीड आणि तीन दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरू झाले आहे. फुटाळा तलावावर विसर्जनासाठी कृत्रिम टँक ठेवण्यात आल्या आहे. जास्तीत जास्त मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टँकमध्ये करण्यासाठी ग्रीन व्हीजिल या पर्यावरणवादी संस्थेचे सदस्य दरवर्षीप्रमाणे तैनात झाले आहे. फुटाळ्यावरील वायुसेनानगरच्या भागातील जबाबदारी या संस्थेने सांभाळली असून, तलावात मूर्ती विसर्जित होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या दोन दिवसात ५०० च्या जवळपास मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात झाल्याची माहिती ग्रीन व्हीजिलचे समन्वयक कौस्तुभ चॅटर्जी यांनी दिली. बुधवारी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी फुटाळ्याला भेट देऊन आढावा घेतला. तलाव संवर्धनाच्या मोहिमेत ग्रीन व्हीजिलचे सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, विष्णूदेव यादव, वृषाली श्रीरंग, कार्तिकी कावळे, नम्रता झवेरी, हेमंत अमेसर, स्मिताली उके, अविनाश लहेवार, निधी बन्सल यांच्यासह कमला नेहरू महाविद्यालय, सेवादल महिला महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहे.