नागपुरात दीड लाख गणेश मूर्तींचे विसर्जन; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा प्रतिसाद

By गणेश हुड | Published: September 10, 2022 05:54 PM2022-09-10T17:54:50+5:302022-09-10T17:56:41+5:30

१४२.२५ टन निर्माल्य संकलन

Immersion of 1.5 lakh Ganesha idols in Nagpur; Citizens' response to environment-friendly Ganpati immersion | नागपुरात दीड लाख गणेश मूर्तींचे विसर्जन; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा प्रतिसाद

नागपुरात दीड लाख गणेश मूर्तींचे विसर्जन; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा प्रतिसाद

googlenewsNext

 नागपूर : गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या.. अशा जयघोषात शुक्रवारी विविध विसर्जनस्थळी नागपुरकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मनपाच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या आवाहनाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर शहरात कृत्रिम टँकमध्ये १ लाख ४० हजार ५३७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. हा आकडा दिड लाखावर जाण्याचा अंदाज आहे.

मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील फुटाळा, गांधीसागर, सक्करदरा, सोनेगाव यासह सर्व तलाव, मैदाने, चौक अशा ठिकाणी विविध २०४ ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी ३९० कृत्रिम टँकची व्यवस्था केली होती. तसेच सर्व झोनमध्ये फिरते विसर्जन कुंड उपलब्ध होते. यात चार फुटापर्यंतच्या मूर्ती विसर्जिंत करण्यात आल्या.

१४२.२५ टन निर्माल्य संकलन 

गणेशोत्सवा दरम्यान सार्वजनिक मंडळाकडील निर्माल्य संकलनासाठी मनपाने व्यवस्था केली होती. गणेशोत्सवादरम्यान १४२.२५ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. यासाठी विसर्जन स्थळी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मनपाने निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती. विसर्जन टँकसमोर दोन स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने निर्माल्य गोळा करत होत

बंदीनंतरही ८.१२ टक्के पीओपी मूर्ती 

शहरात शुक्रवारपर्यंत १ लाख ४० हजार ५३७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पीओपी मूर्तींची उत्पादन व विक्रीला बंदी असतानाही तब्बल ११४१७ पीओपी मूर्ती आढळून आल्या. यामुर्तीची टक्केवारी ८.१२ इतकी आहे. तर मातीच्या ९१.८८ मूर्ती होत्या. गणेशोत्सवाला सुरूवात होण्याच्या आदल्या दिवशी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी घालण्यात आले. बंदी संदर्भात शासनाचे सुरुवातीला स्पष्ट निर्देश नसल्याने पीओपी मूर्तीची विक्री करण्यात आली.

धरमपेठमध्ये सर्वाधिक २६९८२ मूर्ती विसर्जन 

मनपाच्या दहा झोनमधील कृत्रिम टँकमध्ये १४, ०५३७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले यात सर्वाधिक २६९८२ मूर्तीचे विसर्जन धरमपेठ झोनमध्ये करण्यात आले. तर सर्वात कमी २१९८ मूर्ती विसर्जन आशीनगर झोन क्षेत्रात झाले.

मोठया मूर्तींचे विसर्जन शहराबाहेर

शहरात ६३४ सार्वजनिक गणपतींची प्रतिस्थापना करण्यात आली आहे. यात चार फुटापेक्षा कमी उंचीच्या २२३ तर ४११ मूर्ती चार फुटाहून अधिक उंचीच्या होत्या. चार फुटापर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम टँक मध्ये करण्यात आले. तर त्याहून अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन शहराबाहेर करण्यात आले.

१५०० कर्मचारी तैनात 

विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी ३९० कृत्रिम टँक लावण्यात आले.  प्रत्येक टँकवर मनपाचे तीन कर्मचारी तैनात होते. तसेच फिरते विसर्जन कुंड याचा विचार करता १५०० कर्मचारी तैनात होते. 

Web Title: Immersion of 1.5 lakh Ganesha idols in Nagpur; Citizens' response to environment-friendly Ganpati immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.