सात दिवसांत दीड हजार मूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:09 AM2021-09-18T04:09:46+5:302021-09-18T04:09:46+5:30
- ५ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन : प्रदूषणमुक्तसाठी ग्रीन व्हिजिलचे प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फुटाळा तलावाच्या एअरफोर्सच्या ...
- ५ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन : प्रदूषणमुक्तसाठी ग्रीन व्हिजिलचे प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुटाळा तलावाच्या एअरफोर्सच्या भागाला गेल्या सात दिवसांत जवळपास १५०० श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम टाकीमध्ये झाले आहे. यासोबतच ५ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही फुटाळ्याच्या एअरफोर्सच्या भागाला ग्रीन व्हिजिलचे स्वयंसेवक कृत्रिम टाकीमध्ये विसर्जन करण्यासाठी व निर्माल्य संकलन करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
ग्रीन व्हिजिलची टीम गेल्या १२ वर्षांपासून श्री गणपती विसर्जनासाठी संपूर्ण १० दिवस फुटाळा तलावाच्या एअरफोर्स भागाला सज्ज असते आणि भक्तांना इको-फ्रेण्डली विसर्जनासाठी प्रोत्साहित करत असते. यावर्षीही या टीमने जवळपास दीड हजार मूर्तींचे विसर्जन कृत्रिम टाक्क्यांमध्ये केले आहे आणि पाच टन निर्माल्याचे संकलन केले आहे. या मोहिमेला संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, टीम लीड सुरभी जैस्वाल, डिप्टी टीम लीड मेहुल कोसूरकर, विष्णुदेव यादव, शीतल चौधरी, अश्विनी दाबले, श्रीया जोगे, कोमल हटवार, परास जांगडे, सर्वेश नांदेरकर, कोमल वनवे यांच्यासह २५ सदस्य सहभागी आहेत. त्यांच्यासोबत एनडीएसचे जवानही फुटाळा तलावावर तैनात आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पीओपी मूर्तींची विक्री मागल्या दाराने झाली आहे. मात्र, त्यांची मात्रा यंदा कमी असल्याचे सुरभी जैस्वाल म्हणाल्या. पहिल्या सात दिवसात जवळपास १५० पीओपी मूर्तींचे विसर्जन तलावाच्या या भागाला कृत्रिम टाकीमध्ये झाले आहे. अनेक लोकांना पीओपीची मूर्ती मातीची म्हणून विकण्यात आली आहे. या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, तेव्हा भक्तांची निराशा होते. यावर्षी अनेक भक्तांनी मातीच्या मूर्तींनाच प्राधान्य दिले आहे. पीओपी मूर्तींवरील निर्बंध सहा महिन्यांपूर्वी झाले असते, तर यंदाचा श्री गणेशोत्सव पीओपीमुक्त असता, अशी भावना सुरभी यांनी व्यक्त केली. महानगरपालिका आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिकांनीही पीओपी मूर्तींवर बहिष्कार घालणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.
............