रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या रानभाज्या झाल्या दुर्मिळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 01:20 PM2020-07-31T13:20:17+5:302020-07-31T13:22:10+5:30
महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या रानभाज्या वर्षानुवर्षेपासून लोकांच्या आहाराचा भाग राहिल्या आहेत; मात्र आरोग्यदायी असूनही दुर्लक्षामुळे त्या नामशेष होत आहेत.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ चा विळखा रोखणारी औषधी सध्यातरी उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, हाच सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. अशावेळी ही प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या रानभाज्या वर्षानुवर्षेपासून लोकांच्या आहाराचा भाग राहिल्या आहेत; मात्र आरोग्यदायी असूनही दुर्लक्षामुळे त्या नामशेष होत आहेत. कोरोनाच्या निमित्ताने का होईना, या रानभाज्यांच्या संवर्धनाकडे लक्ष वेधले आहे.
पावसाळा आला की रानावनात, शेतात अनेक प्रकारच्या भाज्या फुलायला लागतात. तरोटा, पातूर, शेपू, रानमेथी किंवा फळ प्रकारातील काटवेल या लोकप्रिय भाज्या. केवळ जंगलात मिळणारे काटवेल खायला चवदार आणि आरोग्यदायी आहेत पण दुर्मिळ असल्याने इतर भाज्यांच्या तुलनेत त्याचे दर कायम अधिकच राहिले आहेत. हायब्रीड काटवेल मिळतात पण त्यात रानातल्या काटवेलाची सर नाही, असे हमखास ऐकायला मिळते.
राज्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या लोकांच्या आहारात राहिल्या आहेत. त्यातल्या काही कॉमन तर काही विभागानुसार बदलणाºया आहेत. वनस्पतीतज्ज्ञ डॉ. नानासाहेब उगेमुगे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून रानभाज्यांचे वैशिष्ट्य लोकांसमोर आणले. त्यांच्या सर्वेक्षणानुसार, राज्यात १०४ प्रजातींच्या रानभाज्या आढळून येतात. त्यातील ७६ प्रजाती कॉमन म्हणजे सर्व जिल्ह्यात आढळून येतात. यामध्ये राजगिरा, चवळी, सुरण, सापकांदा, शतावरी, आपटा, कोंदल, काटवेल, रानतरोटा, तरोटा, काटबोर, धोपा, अंबाडी, लाल अंबाडी, उंदिरकानी, रानमेथी, शेवगा, कमळ, लाजाळू, शेपू, चिवडी, घोळ, चिंच, रानपालक या काही कॉमन रानभाज्या आहेत.
२९ प्रकारच्या रानभाज्या या वेगवेगळ्या विभागात दिसून येतात. त्यामध्ये विदर्भात ९, कोकणात ५, मराठवाड्यात ६ आणि खानदेशातील ८ प्रजातींच्या रानभाज्यांचा समावेश असल्याची माहिती डॉ. उगेमुगे यांनी दिली. विदर्भातील भाज्यांमध्ये धानभाजी, गोजिभ, हरदफरी, फासवेल, देवकांदा, झिलबुली, समुद्रशोत, कानफुटी किंवा कपाळफोडी, माक्का आणि पातूरच्या भाजीचा समावेश आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राय लोकांच्या अन्नात रानभाज्यांचा समावेश राहिला आहे. या भाज्यांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता अधिक असते. मात्र या भाज्यांच्या संवर्धनाकडे हवे तसे लक्ष देण्यात आले नाही. कोरोनाच्या निमित्ताने या भाज्यांच्या संवर्धनाचा विषय महत्त्वाचा झाला आहे.
- डॉ. नानासाहेब उगेमुगे, वनस्पतीतज्ज्ञ