कोरोनाचा परिणाम : हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:42 AM2020-03-21T00:42:32+5:302020-03-21T01:06:40+5:30

कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

Impact of Corona: The time of hunger on those who earn on road | कोरोनाचा परिणाम : हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ

कोरोनाचा परिणाम : हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ

Next
ठळक मुद्देतातडीने मदत पोहचवणे आवश्यक

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे रस्त्यांवर हातठेले लावून चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, खाद्यपदार्थ, कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने आदी वस्तू विकणाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. मॉल्स व मोठ्या प्रतिष्ठानांमधील कामगार, हमाल, सुरक्षारक्षक व मालवाहू वाहनचालकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे कमी केल्यामुळे रिक्षाचालक, गटई कामगार, मेहंदी काढणारे आदींचा धंदा मंदावला आहे. अनेकांनी घरकामगारांची सेवा थांबवली आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार शहरातील अशा सुमारे ५० हजारांवर व्यक्तींना कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. परिस्थिती सुरळीत होतपर्यंत या घटकाला भोजन, पाणी व औषधी या तीन गोष्टींचा पुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, सध्या या घटकाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे.

 तर असंतोष उफाळेल
हातावर पोट असणाऱ्या घटकापर्यंत वेळेवर मदत पोहोचली नाही तर, त्यांच्यामध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे झाल्यास हा घटक स्वत:सह कुटुंबाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल व प्रशासनाला जुमानणे सोडून देईल. ती परिस्थिती ओढवू नये याकरिता सरकारने तातडीने मदत योजना जाहीर करणे योग्य होईल, असे बोलले जात आहे.

कुणालाच चिंता नाही
हातावर पोट असणारा घटक सध्या सर्वाधिक अडचणीत आहे. त्या घटकाची कुणालाच चिंता नसल्याचे दिसून येत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. सरकारने या घटकाच्या मदतीसाठी तातडीने योजना जाहीर करावी. या घटकाला वाचविणे आवश्यक आहे.
 हरीश धुरट, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय कष्टकरी पंचायत.

तात्काळ नियोजन करावे
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येईपर्यंत हातावर पोट असणाऱ्या घटकाला कसे जगवता येईल याचे सरकारने तात्काळ नियोजन करावे. या घटकाला भोजन, पाणी व औषधी या तीन गोष्टींचा पुरवठा करणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्यात असंतोष निर्माण होईल.
 विलास भोंगाडे, संयोजक, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल मूव्हमेंट्स.

Web Title: Impact of Corona: The time of hunger on those who earn on road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.