नागपुरात बांधकाम साहित्यांच्या दरवाढीचा बांधकामावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 09:52 PM2018-11-21T21:52:00+5:302018-11-21T21:53:10+5:30
बांधकाम साहित्यांचे दर वाढल्यामुळे लोकांना घर खरेदी आवाक्याबाहेर होणार आहे. सहा महिन्यात रेतीचे भाव दीडपटीने वाढले आहेत. सध्या ४०० क्युबिक फूट रेती २० हजारांवर गेली आहे. तर विटा ६०० ते ७०० रुपयांनी वाढल्या आहेत. त्या तुलनेत लोखंडाच्या किमती ४५ रुपयांवरून ३८ रुपयांपर्यंत कमी झाल्यामुळे बिल्डरांना दिलासा मिळाला आहे. पण विटा आणि रेतीच्या दरवाढीमुळे बांधकामावर परिणाम झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बांधकाम साहित्यांचे दर वाढल्यामुळे लोकांना घर खरेदी आवाक्याबाहेर होणार आहे. सहा महिन्यात रेतीचे भाव दीडपटीने वाढले आहेत. सध्या ४०० क्युबिक फूट रेती २० हजारांवर गेली आहे. तर विटा ६०० ते ७०० रुपयांनी वाढल्या आहेत. त्या तुलनेत लोखंडाच्या किमती ४५ रुपयांवरून ३८ रुपयांपर्यंत कमी झाल्यामुळे बिल्डरांना दिलासा मिळाला आहे. पण विटा आणि रेतीच्या दरवाढीमुळे बांधकामावर परिणाम झाला आहे.
रेतीचा लिलाव नाही
शासनाने अजूनही रेती घाटाचा लिलाव सुरू केलेला नाही. शिवाय अवैध मार्गाने शहरात येणाऱ्या रेतीच्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केल्यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या कालावधीत रेतीचे दर १२ हजारांवरून २० हजारांवर पोहोचले आहे. मध्य प्रदेशातून रेतीची आवक सुरू आहे. पण भाडे आणि रॉयल्टीमुळे दर वाढले आहेत. याशिवाय बाजारात मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध नसल्यामुळे दर आणखी वाढल्याची शक्यता आहे. बांधकाम साहित्यांचे विक्रेते विजय डोर्लीकर यांनी सांगितले.
विटांची दरवाढ
जवळपास एक महिन्यात एक हजार विटांमागे ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाली आहे. कामठी आणि कोराडी येथून येणाºया विटांची किंमत ४८०० रुपये तर रामटेक आणि देवलापार येथील विटांची किंमत ५५०० रुपये आहे. पुढे दर कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय गिट्टीचे दर थोड्याफार प्रमाणात वाढले आहेत. २०० क्युबिक फूटसाठी ५२०० रुपये मोजावे लागत आहेत. अनेक ठिकाणी बांधकाम बंद असल्यामुळे उठाव कमी आहे.
मजुरांची वानवा
नागपुरातील बांधकाम क्षेत्रात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील सर्वाधिक मजूर काम करतात. पण दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका असल्यामुळे ८० टक्के मजूर आपल्या राज्यात परत गेले आहेत. निवडणुका संपल्यानंतरच ते परत बांधकामावर रूजू होतील, असे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
चार महिन्यांपासून विक्री वाढली
गेल्या चार महिन्यांपासून फ्लॅटची विक्री वाढली आहे. रेडी पजेशनला जास्त मागणी आहे. बँकेतून कमी व्याजदरात कर्ज मिळत आहेत. आकडेवारीनुसार बँकेच्या केसेस वाढल्या आहेत. काही बांधकाम साहित्यांचे दर वाढले आहेत तर जीएसटीमुळे काहींचे कमी झाले आहेत. किराया देणारे रेडी पजेशन फ्लॅट खरेदीस उत्सुक आहेत.
गौरव अगरवाला, बिल्डर
शासनाच्या सोबतीने बांधकाम करा
पुणेच्या तुलनेत नागपुरात जमीन आणि फ्लॅटचे दर जास्त आहेत. पुणे येथे शासनाने प्रारंभी पायाभूत सुविधा उभारल्या त्यानंतरच बिल्डर्सने प्रकल्प उभारले. त्याचा फायदा ग्राहक, बिल्डर्स आणि शासनाला झाला. याउलट नागपुरात प्रारंभी प्रकल्प उभारले जातात, त्यानंतरच पायाभूत सुविधा तयार होतात. शासनाच्या सोबतीने बांधकाम झाले पाहिजे. जास्त प्रकल्प आणि उलाढाल असल्यास बांधकाम साहित्यांचे दरही कमी होतील. देशाची आर्थिक स्थिती पाहिल्यास लोकांचे उत्पन्न कमी आहे. बँकांमधून कर्ज घेऊन ते किती वर्ष फेडायचे, हा गंभीर प्रश्न आहे. चार ते पाच वर्षांत कर्ज फेडले जावे. पूर्वी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी स्वप्न विकण्याचे काम केले. त्याचा परिणाम आता दिसत आहे. लोक तपासून खरेदी करीत आहेत. नागपुरातही उत्तम पायाभूत सुविधा आहेत. बिल्डर्सचे भविष्य चांगले आहे.
अशोक मोखा, आर्किटेक्ट