प्रभाव लोकमतचा : अखेर एक्स्पायर्ड अग्निरोधक उपकरणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 12:53 AM2021-01-22T00:53:01+5:302021-01-22T10:06:28+5:30
Expired fire extinguishers finally removed दररोज हजारो नागरिकांचा वावर असलेल्या प्रशासकीय इमारत क्रमांक दोनमधील ‘एक्स्पायर’ झालेली अग्निरोधक उपकरणे अखेर हटविण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दररोज हजारो नागरिकांचा वावर असलेल्या प्रशासकीय इमारत क्रमांक दोनमधील ‘एक्स्पायर’ झालेली अग्निरोधक उपकरणे अखेर हटविण्यात आली आहेत. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच अधिकारी जागे झाले व तातडीने सर्व उपकरणे हटविण्यात आली. दोन ते तीन दिवसांत उपकरणे ‘रिफिल’ करण्यात येण्याची शक्यता असली त्याबाबत अद्यापही ठोस माहिती देण्यात आलेली नाही.
भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर शासनाचे डोळे उघडले व सर्व रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र प्रत्यक्ष अनेक सरकारी विभागांची कार्यालये असणाऱ्या प्रशासकीय इमारत क्रमांक २ मध्ये चक्क वर्षभरापूर्वीच ‘एक्स्पायर’ झालेली अग्निरोधक उपकरणे वापरण्यात येत असल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली. गुरुवारी तातडीने ही उपकरणे काढण्यात आली व त्यांना एकत्रित एका ठिकाणी ठेवण्यात आले. यासंबंधात कंत्राट असलेल्या कंपनीला संपर्क करून तातडीने ‘रिफिल’ करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु याबाबत कालमर्यादा काय ठरविण्यात आली आहे, हा प्रश्न कायम आहे.
आता कशाच्या भरवशावर सुरक्षा?
प्रशासकीय इमारतीच्या परिसरात दररोज हजारो लोक येत असतात. अशा स्थितीत येथे आपत्कालीन घटना घडली तर मोठा धोका होऊ शकतो. इमारतीतील अग्निशमन यंत्रणा ‘अप टू डेट’ आहे की नाही हे तपासण्यात पुढाकार न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘लोकमत’च्या वृत्तानंतर घाम फुटला. गुरुवारी ‘एक्स्पायर’ झालेली सर्व उपकरणे तर काढण्यात आली. मात्र जोपर्यंत ‘रिफिल’ होत नाही तोपर्यंत इमारतीची अग्निसुरक्षा कशाच्या आधारावर आहे, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही.