लोकमतच्या वृत्ताची दखल; नागपुरात आरोपीच्या घराची पुन्हा झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:03 AM2018-03-31T11:03:41+5:302018-03-31T11:04:26+5:30

बहुचर्चित दुहेरी हत्याकांड नरबळीचा प्रकार असल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवारी ठळकपणे प्रकाशित केल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर, आज दिवसभर प्रकरणाशी संबंधित अनेक घडामोडी घडल्या.

Impact of Lokmat news; Police searched accused house in Nagpur | लोकमतच्या वृत्ताची दखल; नागपुरात आरोपीच्या घराची पुन्हा झाडाझडती

लोकमतच्या वृत्ताची दखल; नागपुरात आरोपीच्या घराची पुन्हा झाडाझडती

Next
ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस ताफामहत्त्वपूर्ण चीजवस्तू जप्त

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुचर्चित दुहेरी हत्याकांड नरबळीचा प्रकार असल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवारी ठळकपणे प्रकाशित केल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर, आज दिवसभर प्रकरणाशी संबंधित अनेक घडामोडी घडल्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा ताफा आज रात्री आरोपी शाहूच्या घरी पोहचला. त्यांनी येथे पुन्हा कसून तपासणी करून महत्त्वपूर्ण चिजवस्तू जप्त केल्या.
गणेश शाहू आणि त्याच्या नातेवाईक आरोपींनी दीड वर्षीय राशी रविकांत कांबळे आणि तिची आजी उषा सेवकदास कांबळे (वय ५४) या दोघींची १७ फेब्रुवारीला गळा कापून हत्या केली होती. आरोपींनी या दोघींचे मृतदेह पोत्यात कोंबून विहीरगावजवळच्या नाल्यात फेकले होते. या घटनाक्रमापासून अनभिज्ञ असलेल्या कांबळे परिवारातील सदस्यांनी १७ फेब्रुवारीला उशिरा रात्रीपर्यंत या दोघींचा शोध घेतला आणि अखेर हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस राशी आणि उषा कांबळेंचा शोध घेत असताना १८ फेब्रुवारीला या दोघींचे मृतदेह नाल्यात पडून दिसले. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवून प्रारंभी गणेश शाहू आणि त्याची पत्नी गुडिया या दोघांना अटक केली. तर, या हत्याकांडात मदत करणाऱ्या एका १७ वर्षीय नातेवाईकाला ताब्यात घेऊन चौकशीनंतर त्याला सुधारगृहात पाठविले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त किशोर सुपारे यांनी संशयास्पद भूमिका वठविल्याने त्यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला. त्यानंतरच्या तपासात पोलिसांना चिमुकल्या राशीचे रक्ताने माखलेले कपडे त्यावर करण्यात आलेली पूजा, हळदी, कुंकू आणि अन्य साहित्य सापडले. उषा यांच्या गळ्यातील दागिने पूजास्थळी सापडले. या दोघींचे मृतदेह पोलिसांना मिळाले, त्यावेळी दोघींचेही हात हळद लावल्यासारखे पिवळे होते. राशीच्या गळ्यातील जिवती आणि कानातील बाळ्या अजून मिळाल्या नाहीत. हा एकूणच प्रकार पोलिसांनाही चक्रावून टाकणारा ठरला आहे. हे हत्याकांड आर्थिक व्यवहारातून झाले नाही तर तो नरबळीचा प्रकार असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याने पोलीस हादरले आहेत. त्यांनी या प्रकरणात गोपनियता बाळगली. मात्र, लोकमतने हे दुहेरी हत्याकांड नरबळीचा प्रकार असल्याचे वृत्त ३० मार्चच्या अंकात प्रकाशित केल्याने एकच खळबळ उडाली.

लोकमतच्या वृत्ताचे कात्रण व्हायरल
४या वृत्ताची केवळ उपराजधानीच नव्हे तर राज्यभर चर्चा झाली. लोकमतच्या वृत्ताचे कात्रण सर्वत्र व्हायरल झाले. त्यामुळे पोलीस अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि या प्रकरणातील फिर्यादी रविकांत सेवकदास कांबळे यांनाही ठिकठिकाणाहून विचारणा करणारे फोन आले. दुसरीकडे पोलीस दलातही लोकमतच्या वृत्ताचीच सर्वत्र चर्चा होती. या पार्श्वभूमीवर, पोलिसांचा मोठा ताफा शुक्रवारी रात्री ७ ते ८ च्या सुमारास आरोपी अंकित शाहूला घेऊन घटनास्थळी (त्याच्या घरी) पोहचला. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त राजरत्न बनसोड, हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने यांच्या उपस्थितीत पोलिसांनी पुन्हा एकदा आरोपीच्या घराची कसून तपासणी केली. यावेळी पुन्हा पोलिसांना अनेक आहेपार्ह चिजवस्तू आणि महत्त्वाचे पुरावे ठरणारे साहित्य हाती लागल्याचे समजते.

लुटमारीचे कलम वाढले
४आरोपीच्या घरातील पूजास्थळावरून उषा कांबळे यांचे दागिने जप्त झाल्याने पोलिसांनी आता या प्रकरणात लुटमारीचे कलम ३९४ (भादंवि) वाढवले आहे. या संबंधाने उपायुक्त भरणे यांच्याशी लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीने अधिक माहितीसाठी संपर्क केला असता त्यांनी प्रकरण संवेदनशील आहे, चौकशी सुरू आहे, त्यामुळे तूर्त काही बोलणे योग्य होणार नाही, असे म्हटले.

Web Title: Impact of Lokmat news; Police searched accused house in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा