प्रभाव लोकमतचा : नागपुरातील ध्रुव पॅथॉलॉजीला ५ लाख रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 09:10 PM2020-09-15T21:10:04+5:302020-09-15T21:12:53+5:30
कोविड संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याने शहरातील रामदासपेठ येथील ध्रुव लॅबवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याने शहरातील रामदासपेठ येथील ध्रुव लॅबवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत लॅबमध्ये तपासणीचे काम आवश्यक पूर्तता होईपर्यंत स्थगित करण्याचे निर्देश दिले. मंगळवारी आयुक्तांनी साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत ही कारवाई केली आहे.
सुविश्वास लॅब रामदासपेठ आणि मेट्रो लॅब धंतोली यांनाही मनपाने ताकीद दिली आहे. ऑनलाईन नोंदणीमध्ये तफावत, चाचणीची रियल टाईम नोंद नसणे याशिवाय बरेच अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित असल्याची बाब लक्षात येताच मनपातर्फे नोटीसची कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्या खासगी लॅब ३० ते ४० तासांचा कालावधी लावत असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.
अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांच्या नेतृत्वात पथकाने मनपाद्वारे कोविड चाचणीची परवानगी देण्यात आलेल्या पॅथॉलॉजीची पाहणी केली. यामध्ये ध्रुव पॅथॉलॉजी, सुविश्वास लॅब आणि मेट्रो लॅबमध्ये आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशानुसार एकूण चाचण्या व त्यानुसार करावयाच्या आॅनलाईन नोंदीमध्ये तफावत आढळून आली. यासोबतच लॅबमध्ये होणाºया कोविड चाचणीची रियल टाईम नोंद होणे आवश्यक असताना लॅबमध्ये नोंद न करता अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित ठेवल्याचे पथकाला निदर्शनास आले.
ध्रुव पॅथॉलॉजीने वेळेवर माहिती दिली नाही
ध्रुव पॅथॉलॉजी महापालिकेच्या आरोग्य विभागाला पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती वेळेवर देत नाही. ५, ६ आणि ७ सप्टेंबरला १ हजार ४०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. परंतु फक्त ५७१ रुग्णांची माहिती मनपाला देण्यात आली आणि ८३६ रुग्णांबद्दल माहिती दिलीच नाही. असे निदर्शनास आले. संजय निपाने आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी आयुक्तांच्या परवानगीने ही कारवाई केली. त्यांनी प्रयोगशाळाला आई.सी.एम.आर. निर्देशाप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती मनपाला देण्याचे निर्देश दिले. तसेच मेट्रो लॅब आणि सुविश्वास लॅबला ताकिद देण्यात आली आहे.