स्फोटकांच्या तुटवड्यामुळे कोळसा पुरवठ्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 12:57 PM2022-01-23T12:57:56+5:302022-01-23T13:01:53+5:30
वेकोलीच्या सूत्रांच्या मते स्फोटकांचा तुटवडा असल्यामुळे ब्लास्ट कमी होत आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम पडत आहे.
कमल शर्मा
नागपूर : प्रदेशातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा तुटवडा पडल्यामुळे पुन्हा एकदा विजेचे संकट निर्माण झाले आहे. शासकीय कंपनी महाजनकोने सातपैकी पाच औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा साठा अतिसंवेदनशील स्थितीत पोहोचला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या संकटाचे मुख्य कारण कोळसा कंपन्यांजवळ स्फोटकाचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, दुसरीकडे कोळसा वाहतुकीच्या समस्येमुळे हे संकट वाढत आहे.
पावसाळ्यात कोळशाचा तुटवडा निर्माण होणे ही साधारण बाब आहे. परंतु जानेवारी महिन्यातही तुटवडा भासत आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. (वेकोली) ने महाजनकोला अशी माहिती दिली की, गोकुळ, सास्ती आणि पवनी खाणीतून दररोज १२ हजार टन कोळशाचे उत्खनन होत आहे. परंतु प्रत्यक्षात जानेवारी महिना सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे.
वेकोलीच्या सूत्रांच्या मते स्फोटकांचा तुटवडा असल्यामुळे ब्लास्ट कमी होत आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम पडत आहे. बेरुत देशात झालेल्या स्फोटानंतर स्फोटकांच्या आयातीवर परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमात झालेल्या संशोधनामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. परंतु कोळसा उत्पादनासाठी पुरेसे स्फोटक मिळविण्यात यश येत असल्याचा दावा वेकोलीने केला आहे.
- चंद्रपूरचे दोन युनिट बंद
महाजनकोच्या कोराडी आणि खापरखेडात कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. चंद्रपूर, पारस, भुसावळ, नाशिक आणि परळी वीज केंद्रात दीड ते दोन दिवसांचा साठा उपलब्ध आहे. चंद्रपूरचे युनिट ३ आणि ४ कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद करण्यात आले आहे. इतर युनिटच्या उत्पादनावरही प्रभाव पडला आहे. तर, इतर स्रोतांकडून वीज मिळवून भारनियमन होऊ देणार नसल्याचा दावा महावितरणने केला आहे.
-कर्ज घेऊन वेकोलीला दिले दोन हजार कोटी
महाजनकोने या दरम्यान कर्ज घेऊन वेकोलीला दोन हजार कोटी रुपये दिले आहेत. अद्यापही ६६० कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. अशात महाजनकोच्या मते वेकोलीने त्यांना पुरेसा कोळसा पुरविणे आवश्यक आहे. तर, विजेच्या संकटाची माहिती ऊर्जा मंत्रालयाने केंद्र शासनाला दिली आहे. समस्या सोडविण्यासाठी वीज आणि कोळसा उत्पादन कंपन्यांच्या बैठका आणि कोळसा खाणींचे निरीक्षणही सुरू झाले आहे.