गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाचा ‘बुलडाणा पॅटर्न’ राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:12 AM2021-01-16T04:12:54+5:302021-01-16T04:12:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसंधारणाचा ‘बुलडाणा पॅटर्न’ राबवावा तसेच जलसंधारणाच्या अपूर्ण बंधाऱ्यांची कामे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसंधारणाचा ‘बुलडाणा पॅटर्न’ राबवावा तसेच जलसंधारणाच्या अपूर्ण बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला.
‘बुलडाणा पॅटर्न’ला नीती आयोगाने मान्यता दिली असून, संपूर्ण राज्यात हा पॅटर्न राबविला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बंधाऱ्यांची अपूर्ण असलेली कामे आधी पूर्ण करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यात लहान-लहान उद्योगांचे जाळे निर्माण करण्यासाठी एमएसएमईच्या योजना समजावून घ्या व गडचिरोली जिल्ह्यात जो कच्चा माल उपलब्ध असेल, त्यावर आधारित उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करा. जिल्ह्यातील मालगुजारी तलाव, नदी-नाल्यांचे खोलीकरण करून त्यातील माती महामार्गाच्या कामासाठी द्या. यासंदर्भात शासकीय परिपत्रकही प्रसिद्ध झाले आहे. या परिपत्रकाचा आधार घेत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात होऊ शकतील, अशा सूचनाही गडकरी यांनी केल्या.