पांढऱ्या वाटाण्यावर आयात शुल्क २० हजार रुपये क्विंटल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:35 PM2019-12-31T23:35:47+5:302019-12-31T23:38:52+5:30
पांढऱ्या वाटाण्यावर प्रति क्विंटल २० हजार रुपये आयात शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने देशात वाटाण्यासह या वाटाण्यापासून तयार होणारे बेसनही महाग होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यानंतर सरकारने एखाद्या शेतकी उत्पादनावर चारपट आयात शुल्क आकारण्याची पहिलीच वेळ आहे. पांढऱ्या वाटाण्यावर प्रति क्विंटल २० हजार रुपये आयात शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने देशात वाटाण्यासह या वाटाण्यापासून तयार होणारे बेसनही महाग होणार आहे.
होलसेल धान्य बाजाराचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले की, पूर्वी पांढरे वाटाणे स्वस्तात कॅनडा येथून आयात व्हायचे. ते २५०० आणि ३ हजार रुपये विकले जायचे. त्याच्या डाळीचे दर ३५०० ते ३८०० रुपये होते. तीन वर्षांपूर्वी सर्वच डाळीचे दर १०० रुपयांवर पोहोचल्यानंतरही वाटाणा डाळीचे भाव ३५ ते ४० रुपये किलो होते. चणा डाळीचे भाव जास्त असल्यामुळे वाटाणा डाळीचे बेसन लोकप्रिय आणि स्वस्त होते. चणा डाळीच्या बेसनमध्ये वाटाणा डाळीचे मिश्रण करण्यात येत होते. चणा डाळीचे भाव कमी झाल्यानंतरही ग्रामीण भागात वाटाणा डाळीला लोकांची पसंती होती.
आता सरकारने वाटाणा आयातीचे नियम कठोर केले आहे. ५० टक्के ड्युटीसह २० हजार रुपये प्रति क्विंटल किमान आयात शुल्क केले आहे. सर्व खर्चासह वाटाणाची आयात पोर्टवर ३० हजार रुपये क्विंटल होईल आणि ग्राहकांपर्यंत येईपर्यंत भाव ३५ ते ४० हजारपर्यंत जाणार आहे. ही सरकारची अतिशयोक्ती आहे. आता देशात पांढऱ्या वाटाण्याची आयात अशक्य आहे. त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे. आता लोकांना स्वदेशी निर्मित वाटाण्यावर अवलंबून राहावे लागेल.
मोटवानी म्हणाले, देशात यावर्षी वाटाण्याचे पीक ९ लाख हेक्टरवर आहे. सरकारच्या अधिसूचनेनंतर एकाच दिवसात वाटाण्याच्या किमतीत २० टक्के वाढ होऊन भाव ७ हजारांवर पोहोचले आहेत. पूर्वी चण्यापेक्षा वाटाण्याचे भाव प्रति क्विंटल ५०० ते ७०० रुपये कमी असायचे. पण आता ठोकमध्ये चणे ४५०० ते ४६०० रुपये क्विंटल असून वाटाण्यापेक्षा १५०० ते १७०० रुपये कमी आहेत. वाटाण्याचे भाव वाढल्याने चण्याचे भावही वाढले आहेत.