वैद्यकीय उपकरणे आयातीला पर्याय निर्माण व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:07 AM2021-06-06T04:07:18+5:302021-06-06T04:07:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे संकट आपण परतवून लावले. या दरम्यानच प्राणवायू न मिळाल्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे संकट आपण परतवून लावले. या दरम्यानच प्राणवायू न मिळाल्यामुळे रुग्णांवर कसे संकट कोसळले, हे आपण प्रत्यक्ष अनुभवले आहे. अत्यंत वाईट स्थिती निर्माण झाली असताना प्राणवायू खूप महत्त्वाचा घटक ठरला आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, बायपॅप यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहे. पण ही वैद्यकीय उपकरणे भारतात तयार होऊन या क्षेत्रातही देश आत्मनिर्भर झाला पाहिजे. वैद्यकीय उपकरणांच्या आयातीला पर्याय निर्माण व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
‘एएमटीझेड’च्या ओ-२ होम कॉन्सन्ट्रेटरचा शुभारंभ शनिवारी गडकरी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आभासी कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर, बायपॅप यांची बँक व्हावी, ही कल्पना पुढे आली. नागपुरात तीन ठिकाणी अशी बँक सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील चित्र मात्र अत्यंत गंभीर आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी क्षेत्रात तर डॉक्टर उपलब्ध नाही. वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणांबाबत आम्हाला अधिक प्रगती करणे गरजेचे आहे. ‘मेडिकल डिव्हाईस’चे १० ते १५ पार्क आपल्याला देशात उभे करायचे आहेत. आजही काही साहित्य देशाला परदेशातून आयात करावे लागते. आयात होणारे साहित्यही भारतातच निर्माण व्हावे व आयातीला पर्याय निर्माण व्हावा, असेही गडकरी म्हणाले.