लॉकडाऊनमुळे वाढले गुरुजी व शाळेचे महत्त्व.....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 10:23 PM2021-07-24T22:23:02+5:302021-07-24T22:23:30+5:30
शाळा नसली, गुरुजी नसले तरी घरगुती तंत्रज्ञानाचा वापर करून मुलं ही शिकू शकतात अशी मानसिकता पालकांची बनलेली दिसत होती. परंतु कोविड १९ च्या संकटामुळे शाळा लॉक झाल्या व हळूहळू ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेला महत्त्व आले.
नागपूर: अलीकडच्या काळामध्ये विविध साधने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगतीने ज्ञानार्जन करणे सोयीचे वाटत असल्याने गुरुजी व शाळेचे महत्त्व पालकांच्या मनात कमी होताना दिसत होते . शाळा नसली, गुरुजी नसले तरी घरगुती तंत्रज्ञानाचा वापर करून मुलं ही शिकू शकतात अशी मानसिकता पालकांची बनलेली दिसत होती. परंतु कोविड १९ च्या संकटामुळे शाळा लॉक झाल्या व हळूहळू ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेला महत्त्व आले.
परंतु शाळा असली की, कुटुंबासह विद्यार्थ्याची दिनचर्या एका बंधनात असते. विद्यार्थी भल्या पहाटेपासून शाळेच्या तयारीसाठी लवकर उठतो, शाळेची तयारी करुन दिलेला गृहपाठ, स्वाध्याय वेळच्या वेळी सोडवतो, वेळेवर जेवण करतो, शाळेत सकाळी ११ ते ५ दरम्यान शिक्षक व मित्रांना भेटल्याने वेगळ्या प्रकारची उर्जा निर्माण होऊन परिपाठापासून ते दिवसभर सर्वांशी समायोजन साधून खेळ, क्रीडा, गप्पा, गाणीगोष्टी, वाचन, लेखन, पाठांतर, कृती यांच्यासह दहा नैतिक मूल्यांप्रमाणे वागण्याचाबोलण्याचा प्रयत्न करतो. परिपाठातील राष्ट्रगीत, प्रार्थना, संविधान, बातम्या, दिनांक, वार, दिनविशेष, सुविचार, चिंतन, मनन, मौन आदींमुळे एक स्वतंत्र जीवनशैली निर्माण होते.
या सर्व जीवनशैलीपासून पाल्य वंचित राहिल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. मुले ऑनलाईन अभ्यास करताकरता इतर मार्गाला लागण्याबरोबरच स्वमग्न व विविध आजाराने ग्रस्त होण्याबरोबरच अभ्यासाचा कंटाळा करू लागली आहेत. लेखन व गणिती क्रिया करण्याचे विसरल्यागत वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागामध्ये तर पालकांचे ऑनलाईन शिक्षणाला सहकार्य मिळत नाही.
लॉकडाऊन काळात आमची मुले अभ्यास करत नाहीत. ऑनलाईन व्हिडिओ पाहत नाहीत. आम्हालाही त्यांना वेळ देता येत नाही. शेतीची कामे, मजुरीची कामे आहेत. मोबाईल घेऊन जावे लागते. रिचार्ज नाही मुले अभ्यास करत नाही. चिडचिड करतात दंगामस्ती करत आहेत, त्रास देत आहेत, यामुळे आम्ही फार त्रस्त झालो गुरुजी, शाळा केव्हा चालू होते? अशी वाक्ये एरव्ही शाळेकडे ढुंकुनही न पाहणाऱ्या पालकांच्या तोंडून ऐकू येत आहेत. एकच पालक नाही तर, असे अनेक पालक या विषयी चिंताग्रस्त दिसत आहेत. ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व नाही. तर शाळा केव्हा सुरू होत आहे. अशी वारंवार विचारणा करताना पालक दिसत आहेत.
शहरी असो वा ग्रामीण सगळ्यांनाच कळून चुकले की गुरुजीविना किंवा शाळेविना मुलांचे ज्ञानार्जन तसेच शारिरीक, भावनिक व मानसिक विकास साधणे फार अवघड होत आहे.
पूर्वी गुरुकुल पद्धतीने ऑफलाइन शिक्षणालाच महत्त्व प्राप्त झाले होते व आजही ते कायमच आहे. ऑफलाइनला पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया ही असली पाहिजे पण ऑनलाईनने परिपूर्णता येणारच नाही हे यातून लक्षात येते. गेल्या दिड वर्षापासून शाळा बंद असल्याने कोरोनामुळे का होईना ग्रामीण भागातील विद्यामंदीर व गुरुजनांना अच्छे दिन येत आहेत.
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णु: गुरुदेर्वो महेश्वर: । गुरु: साक्षात परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: हे खरे ठरताना दिसत आहे.
साहेबराव आ.राठोड
जि.प.प्राथ.शाळा,वडसद तांडा पं.स.पुसद जि.यवतमाळ