विश्वसनीयतेवर मृत्यूपूर्व बयानाचे महत्त्व
By admin | Published: August 4, 2014 12:56 AM2014-08-04T00:56:48+5:302014-08-04T00:56:48+5:30
न्यायालयामध्ये मृत्यूपूर्व बयानाचे महत्त्व विश्वसनीयतेवर ठरत असते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात ही बाब स्पष्ट केली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये मृत्यूपूर्व बयान अन्य
हायकोर्ट : सत्यतेबाबत समाधान होणे आवश्यक
राकेश घानोडे - नागपूर
न्यायालयामध्ये मृत्यूपूर्व बयानाचे महत्त्व विश्वसनीयतेवर ठरत असते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात ही बाब स्पष्ट केली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये मृत्यूपूर्व बयान अन्य तथ्यांसोबत पडताळून पाहिलेच पाहिजे हे आवश्यक नाही. सत्यतेबाबत समाधान झाल्यास केवळ मृत्यूपूर्व बयानाच्या आधारावरही आरोपीला दोषी ठरविले जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने वरील खुलासा करून स्वत:च्या मुलाला जाळणाऱ्या आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे. सुखदेव टिकाराम भारद्वाज (३५) असे आरोपीचे नाव असून तो वैरागड, ता. आरमोरी येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड भरला नाही तर एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती एम.एल. तहलियानी यांनी त्याचे अपील फेटाळून लावले.
मृताचे नाव विशाल होते. खटल्यातील माहितीनुसार, सुखदेवने पहिली पत्नी सुनीताला घटस्फोट दिला होता. तो कोकाडी येथील रेवतीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. रेवतीपासून त्याला दोन मुले झालीत. विशाल मोठा मुलगा होता. सुखदेवसोबत भांडण झाल्यामुळे रेवती एकटीच माहेरी राहायला गेली होती. २२ जानेवारी २०१० रोजी पहाटे ४ च्या सुमारास सुखदेवने विशालला अंगावर रॉकेल टाकून जाळले. २३ जानेवारी रोजी त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तत्पूर्वी त्याने मृत्यूपूर्व बयानात सुखदेवने जाळल्याची माहिती दिली. विशाल ७०.५ टक्के जळाला होता. सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले होते.